पुण्यातील पोटनिवडणुकांसाठी भाजपचे उमेदवार ठरले; कसब्यातून हेमंत रासने, तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांना उमेदवारी
कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे
RaviRaj 4 Jan 2023
पुणे : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी भाजपकडून हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी भाडपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे. दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे.
पुण्यातील कसबा-चिंचवड विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीचं वातावरण मागील काही दिवसांपासून चांगलंच तापलं होतं. या दोन्ही मतदार संघासाठी उमेदवारांची मोठी यादी होती. त्यात कसबा मतदार संघाच मुक्ता टिळकांचे पती शैलेश टिळक याचं नाव अघाडीवर होतं. शिवाय धीरज घाटे आणि गणेश बिडकर यांच्यादेखील नावाची चर्चा होती. आतापर्यंतच पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी पाहता टिळक कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळेल, अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. तसं शैलेश टिळकांनी बोलून दाखवलं होतं. मात्र त्यांना वगळून अचानक उमेदवारीच्या रेस मध्ये असलेले हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
चिंचवड मतदार संघात जगताप कुटुंबातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची भाजपच्या उमेदवारीसाठी घोषणा झाली आहे. या मतदार संघाच्या जागेसाठी सुरुवातीपासून घरातीलच दोघांच्या नावाची चर्चा होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि लहान बंधू शंकर जगताप यां दोघांपैकी एकाची उमेदवारीसाठी वर्णी लागणार होती. त्यात पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप या दोघांनीही दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतले होते. शिवाय त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या समर्थकांमध्येही दोन गट पडल्याचं दिसून आलं. समर्थकांकडून सोशल मीडियावर पोस्टरदेखील शेअर करण्यात आले होते. त्यात “आदेश पक्षाचा, निर्धार जनतेचा” असा आशय लिहिण्यात आला होतं.
अश्विनी जगताप कोण आहेत?
अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहे. सातारा हे त्यांचं मुळ गाव आहे. निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची लेक आहेत. प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आहेत. या प्रतिष्ठानद्वारे महिला बचत गटांचं जाळं पसरवलं आहे. महिलांच्या विकासासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. लक्ष्मण जगताप निवडणुकीस उभे असताना त्या प्रचारात सक्रीय असायच्या. मात्र निवडणूक त्या पहिल्यांदाच लढवत आहेत.
कोण आहेत हेमंत रासने?
हेमंत रासने हे पुणे महानगर पालिकेचे भाजपचे नगरसेवक आहेत. पुणे महापालिकेचे भाजपचे ते दोन टर्म स्थायी समिती अध्यक्ष होते. पुण्याच्या विकासासाठी त्याचं मोठं योगदान आहे.