शरदचंद्र पवार यांची पक्ष अध्यक्षपदाची निवृत्ती ! म्हणजेच देशाच्या राजकारणातील नवीन पर्वाची सुरुवात..
Ravi Raj 3 may 2023
शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष यांनी काल राजकारणातून संन्यास घेतला नसला तरी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच आपण समाजकारणात सक्रीय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एका प्रचंड अनुभवी नेत्याने अध्यक्षपदावरून घेतलेली ही ‘निवृत्ती’ खर्या अर्थाने राजकीय क्षेत्रात अनुकरणीय ठरेल काय?
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून आपली राजकीय कारकिर्द सुरू करणारे आणि 1967 मध्ये प्रथमत: 27 वर्षे वयाचे असतांना महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पोहोचलेले शरद पवार यांची राजकीय कारकिर्द एका अग्रलेखात येणारी निश्चितच नाही याची खात्री आमच्या लेखणीला आहे. परंतू आपल्या विधानसभा ते लोकसभा या 56 वर्षांच्या राजकीय प्रवासात राज्याचे मुख्यमंत्री ते देशाचे कृषीमंत्री आणि संरक्षण मंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता या पदांवर काम करतांना त्यांनी राज्यासह देशाला आपल्या कामाच्या माध्यमातून करून दिलेली ओळख ही एक ‘समृध्द’ राजकीय अनुभवांची मोठी गोष्ट आहे. किंबहुना अनुभवांचे एक पुस्तक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. राजकरणात येणार्या सर्व पक्षाच्या तरूणांसाठी शरद पवार यांच्या जीवनातील अनुभव हे ‘मैलाच्या दगडा’सारखे आहेत. यशवंतराव चव्हाणांना ‘गुरू’ मानून आणि त्यांचा ‘समृध्द वारसा’ घेवून राजकारणाच्या प्रवासाला सुरूवात करणारे शरद पवार हे अनुभव संपन्न, चारित्र्य संपन्न, राजकारणातील चाणक्य, माणसांचा संग्रह करणारे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेणारे, तरूण रक्ताला वाव देणारे, शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी यांच्या वेदना हृदयात असणारे आणि त्यांच्या कल्याणासाठी आपल्या राजकीय पदाचा वापर करून जनहिताचे कल्याणकारी निर्णय घेणारे व्यक्तिमत्व आहे, यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. राजकारणातील ‘तेल लावलेला पहेलवान’ इथपासून तर महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत अशी त्यांची गणना केली गेली. देशातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध असलेले एकमेव नेते म्हणून शरद पवार यांचेच नाव घेतले जाते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर चार वेळा जवळपास 16 वर्षे त्यांनी कारभार पाहिला. राज्यातील हजारो कार्यकर्त्यांची आणि पदाधिकार्यांची नावे आणि गावे पाठ असलेल्या शरद पवारं हे दिल्लीच्या लोकसभेत सहावेळा निवडून आलेत. देशाच्या केंद्रीय कृषीमंत्री पदावर असतांना त्यांनी अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतलेत. रोजगार हमी योजना असेल किंवा बेटी बचाव, बेटी पढाव सारखे कायदे त्यांनी आपल्याच कार्यकाळात केलेले आहेत. बाबरी मशीद पाडण्यात किंवा राम मंदीर उभारणीत त्यांचा सहभाग असल्याचा कोणताही ‘ठपका’ त्यांच्या जीवन वृत्तावर नाही. कारण ते सर्वधर्म समभाव, धर्म निरपेक्षतेचे समर्थक होते आणि आहेत. हिंदु-मुसलमान, जात-पात-धर्म-पंथ या जोखाडात अडकून स्वत:ला मोठे सिध्द करण्याचा प्रयत्न त्यांनी कधीही केला नाही. उलट शेतकर्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढणारा लढवय्या नेता म्हणून त्यांची “जाणता राजा” या नावाशी तुलना केली गेली आणि त्यात सत्यता देखील आहे. राजकीय मतभेद असतात, आरोप-प्रत्यारोप देखील होतात. परंतू बारामती या त्यांच्या कर्मभूमीत देशाचे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी आपल्या जाहीर भाषणात त्यांना आपले ‘राजकीय गुरू’ शरद पवार असल्याचे म्हटले, ही साधारण बाब नाही. शरद पवार यांनी आपली पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहिर केल्याने राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? यावर आजचा इंडिया न्यूज प्रतिनिधीचा अग्रलेख नाही. तर देशाच्या एका मोठ्या नेत्याने पक्षाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा या देशात एका नव्या परंपरेची ‘नांदी’ ठरणार का? असा प्रश्न या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांसाठी उपस्थित झाला आहे. देशाला पंच्च्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत, परंतू आपल्या वयाची पंच्च्याहत्तरी पूर्ण झाली असली तरी काँग्रेस सारख्या मातृपक्षाला सोडून जाणार्या गुलाम नबी सारख्या नेत्यांसाठी ही ‘चपराक’ आहे. शरद पवार यांच्या पक्षीय निवृत्तीपुढे त्यांच्यानंतर राष्ट्रवादीचे काय? राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व कुणाकडे जाणार? हे प्रश्न महत्त्वाचे असले तरी पवार साहेबांच्या निवृत्तीपुढे ते थिटे ठरतात. प्रश्न असा आहे की सर्वच राजकीय पक्षातील वयोवृध्द ज्येष्ठ नेत्यांनी आता राजकीय सेवा निवृत्तीची घोषणा करावी. आणि तरूण रक्ताला वाव दिला तर भारतासारख्या या देशाला ‘मेक इन इंडिया’ बनण्यास खुप कालावधी लागेल असे वाटत नाही. प्रश्न केवळ एकच की हिंदुत्वाच्या अजेंड्यावर देशाचे राजकारण हे जास्त काळ टिकणार नाही. ज्या पध्दतीने शरद पवार यांनी महाराष्ट्रात आर. आर. पाटील यांच्यासारखे जवळपास शंभर तरूण आमदार तयार केले, त्यांना संधी दिली आणि सदनात देखील पाठविले, अशा प्रकारची कामे काँग्रेस पक्षात होवू शकली नाही. घराणेशाहीच्या नादात पक्ष संपतो, तरीही पदांच्या खुर्च्या खाली होत नाही, म्हणून स्वत:च आपली ‘खुर्ची’ खाली करून एक संदेश देशाला देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. श्रीमती सोनिया गांधी यांचा विदेशीचा मुद्दा त्यांनी उचलला नसता तर कदाचित ते देशाचे दोन वेळा प्रधानमंत्री राहिले असते. एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल यांच्यासारख्या नेत्यांचा नंबर प्रधानमंत्री पदावर लागला नसता. परंतू शरद पवार यांच्या बुध्दीला जे पटले नाही ते त्यांनी बोलून दाखविले. असे असतांनाही त्यांनी धर्म निरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची साथ कधीही सोडली नाही. राजकीय बुध्दीबळाच्या पटलावर त्यांना कुणीही पराभूत करू शकले नाही, ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या पक्षाध्यक्ष सेवा निवृत्तीमागेही काही राजकीय ‘डावपेच’ आहेत हे मान्य करावे लागेल. असे असले तरी त्यांनी जाहीर केलेली अध्यक्षपदाच्या निवृत्तीची भूमिका, राजकीय इतिहास महत्वपूर्ण ठरेल. राज्यात उध्दव ठाकरे यांची वाढलेली सहानुभूती, राहुल गांधी यांच्या संदर्भात देशात वाढलेली लोकप्रियता या दोन बाबींचा संदर्भ यामागे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘भाकरी फिरवली नाही तर ती करपते’ या त्यांच्या विधानाचा अर्थ राजकीय परिप्रेक्षात खुप मोठा आहे….