विहिरीत पडून शेवटची घटका मोजणाऱ्या इसमाला पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनने दिले जीवनदान..
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची धाडसी कामगिरी..
RaviRaj 6 March 2024
मुर्तीजापुर तालुक्यातील उमरी शेत शिवारात किनखेड नजीक मुर्तीजापुर येथील अशोक सावळे यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी शेतात गहू सोंगण्यासाठी आलेल्या कामठा येथील शेतकरी महिला नंदाबाई गांजरे यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना एक इसम विहिरीत असताना दिसून आला यावेळी लगेच शेतमालकांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीव रक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ मदतीसाठी येण्यासाठी विनंती केली क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी मुर्तीजापुर उपविभागीय अधिकारी संदीप अपार साहेब यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन करिता आपले सहकारी मयूर सडेदार,महेश वानखडे,शुभम वानखडे,शरद महल्ले, तसेच रेस्क्यू वाहन आणि शोध व बचाव साहित्य घेऊन अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचले यावेळी तेथील सीन ट्रेस केला असता मोठी कच्ची विहीर त्यामध्ये वीस ते पंचवीस फूट पाणी आणि पाण्यापासून वर तीस फूट उंच असलेल्या विहिरीत एक इसम पडलेला दिसून आला यावेळी त्याला वरून आवाज दिले असता तो कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता आणि विहिर ही पूर्णपणे कच्ची असल्याने विहिरीमध्ये जाण्यासाठी आणि वर येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग नसल्यामुळे आत जाताना दगड माती खचण्याची दाट शक्यता होती तेव्हा लगेच जीरक्षक दीपक सदाफळे यांनी मुर्तीजापुर तहसीलदार बोबडे मॅडम यांना फोन करून माहिती दिली आणि तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन चालू केले विहिरीच्या आत मध्ये जाताना दगडाला धक्का जरी लागला तर दगड पडायला सुरुवात होत होती यावेळी रेस्क्यू सीडी आत मध्ये टाकून वायर रोप लॉक करून बेस तयार केला आणि लगेच जिरक्षक दीपक सदाफळे यांनी सीट होर्नेक्स,हेल्मेट, लाइफ जॅकेट, वायर रोप,आणि दूध व बिस्किट घेऊन आपल्या कल्पकतेने धाडसाने आत मध्ये उतरले झोपलेल्या इसमाच्या चेहऱ्यासमोरून जाऊन त्याच्याशी हळू आवाजात संवाद केला यावेळी त्यांनी हलका प्रतिसाद दिला आणि पुन्हा दीपक सदाफळे यांनी समुपदेशन करत त्याच्यासोबत संवाद साधायला सुरुवात केली
यावेळी त्यांनी प्रथम आपले नाव प्रकाश असल्याचे सांगितले आणि विहिरीत उडी घेतली कधी विहिरीत पडलो असे सांगत होता तेव्हा लगेच त्याचे समुपदेशन करत आपण घाबरू नका आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहोत आणि आपल्याला वरती जाऊन हॉस्पिटलला जायचं आहे असे सांगितले यावेळी त्या इसमाच्या हालचालीवरून तो इसम कालपासून विहिरीत पडलेला असल्याची खात्री झाली त्याचे नाव आणि त्याच्यासोबत विचारपूस केली असता फक्त त्यांनी प्रकाश असल्याचे सांगितले पोटात अन्न पाणी नसल्याने तो खूप गळालेला अशक्त झालेला दिसून आला व्यवस्थित जागेवर प्रथमोपचार करून त्याला एनर्जील दिले आणि रेस्क्यू ऑपरेशन चालू केले विहिरीतील इसमाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ न देता सुखरूप वर आणले आणि मेडिकल प्रथमोपचार करून लगेच आपल्या रुग्णवाहिकेने मुर्तीजापुर येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचून दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी अपार साहेब तहसीलदार बोबडे मॅडम यांनी पाठवलेली मूर्तिजापूर येथील 108 रुग्णवाहिका किनखेड फाट्यावर आली होती.. धोतरा निंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर सुद्धा घटनास्थळी हजर होते अशी माहिती जीव रक्षक दीपक सदाफळे यांनी दिली आहे..