कावड यात्रेच्या भक्तांची सुरक्षा वाऱ्यावर..जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण ? पोलीस व लोकप्रतिनिधी गंभीर नाहीत..
Sanjay Shelke 25 August 2024
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी परंपरागत असलेली राज राजेश्वर कावड यात्रा यावर्षी श्रावण महिन्यात पाच सोमवार येत असल्याने पाचव्या सोमवारी नेहमीप्रमाणे उत्साहात साजरी होणार आहे. परंतु अकोट तालुक्यातील कावड यात्रा मात्र दरवर्षीप्रमाणे चौथ्या सोमवारी ढोल ताशाच्या गजरात अकोट ला पोहोचणार आहे त्याचीच लगबग गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. त्याकरिता नगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासन, व इतर संबंधित सर्वच विभागाकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. परंतु या सर्व विभागाकडून नियमित होणार्या चुका मात्र कोणीही दुरुस्त करीत नाही. व ह्या चुका दुरुस्ती करण्याची मानसिकता अधिकाऱ्यांमध्ये तर नाहीच परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.
त्यामुळे दरवर्षी कावड यात्रेमधील भक्तांच्या जीवित हानी होण्याच्या दुर्घटना वाढत आहेत. एवढ्या मोठ्या कावड यात्रेचे योग्य नियोजन होण्यासाठी यात्रेदरम्यान रविवार रात्री व सोमवार दिवसभर असे 24 तासाकरिता प्रत्येकी एक किलोमीटर अंतरावर एक पोलीस कर्मचारी तैनात असणे गरजेचे आहे. की ज्यामुळे अकोट वरून अकोला येणारी सर्वात महत्त्वाची ॲम्बुलन्स सेवा ही सुरळीत राहील.. ॲम्बुलन्स मधील पेशंट हा कोणत्याही अडथळा विना अकोला रुग्णालयात पोहोचेल..
सोबतच कावड धारी भक्तांमध्ये रस्त्यावरून चालताना नियोजनाचा अभाव दिसणार नाही प्रत्येकी एक किलोमीटरवर पोलीस कर्मचारी तैनात असल्यामुळे रस्त्याची एक बाजू अति आवश्यक सेवा असलेली ॲम्बुलन्स करिता खुली राहील. असा हा संवेदनशील विषय कोणत्याही लोकप्रतिनिधीला महत्त्वाचा वाटला नाही. कारण विद्यमान सरकारमधील आमदार यांचे अस्तित्व शून्य आहे. पोलिसांना मनुष्यबळ वाढवण्याची सूचना करण्याची हिंम्मतच या लोकप्रतिनिधींमध्ये नाही. आपल्या आमदारकीचा उपयोग हा फक्त किरकोळ अशा गोष्टीसाठी पायऱ्यांवर चुना रेखाटून विद्युत खांबावर दोन-चार लाईट लावून स्वतःचा गाजागाजा करून घेण्यातच धन्यता मानत आहेत.
विद्यमान खासदार, अकोला पूर्वचे आमदार, व अकोटचे आमदार यांनी कावड यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी व ॲम्बुलन्स करिता तात्काळ पोलीस मनुष्यबळ वाढवून अकोट ते अकोला रस्त्यावर प्रत्येकी एक किलोमीटरवर अंतरावर एक पोलीस कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना देण्याची गरज आहे. परंतु असे होणार नाही कारण विद्यमान खासदार व दोन्ही आमदार हे आपल्या अधिकाराचा वापरच करू शकत नाहीत या भाजपा सरकारमध्ये या आमदार खासदारांचे अस्तित्व शून्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या आमदारांनी चिल्लर कामातच आपला स्वतःचा गाजावाजा करून आपल्या कार्यकर्त्यांना भ्रमात ठेवून समाज माध्यमावर ” महायुती सरकार कामगिरी दमदार” चे मेसेज पाठवण्यातच गुंतून ठेवले आहे.. परंतु पत्रकार रविराज मोरे हे स्वस्त बसणारे व्यक्तिमत्व नसून एक महिन्यापूर्वीच 11 जुलैला च पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांना कावड यात्रेदरम्यान प्रत्येकी एक किलोमीटरवर एक पोलीस कर्मचारी तैनात असावा असे निवेदन दिले होते..
त्यामुळे मोरे यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने अकोला पोलीस काय भूमिका घेतात..ॲम्बुलन्स व भक्तांच्या सुरक्षेला किती प्राधान्य देतात की पोलीस सुद्धा या घाणेरड्या राजकारणाला बळी पडतात हे बघणे गरजेचे आहे..अन्यथा रविराज मोरे यांच्या निवेदनाची दखल न घेतल्यास पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन करण्याची तयारी सुद्धा मोरे यांनी दाखवली आहे ..मागच्या वर्षी अकोट मधील एका पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू कावड यात्रे दरम्यान झाला होता..यावर्षी सुद्धा अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रविराज मोरे यांनी अशा प्रकारच्या धरणे आंदोलनाचा कठोर पवित्रा घेतला आहे.. विद्यमान आमदारांच्या निष्क्रियपणामुळे आज रविराज मोरे यांच्यासारख्या पत्रकारांना अशा प्रकारच्या धरणे आंदोलनाकरिता पुढाकार घ्यावा लागत आहे. ही बाब दुर्दैवी आहे..