कळव्यातील मदरशामधील धक्कादायक प्रकार समोर; मुलांनी पळ काढल्यानंतर घटना उघडकीस….
रेल्वे पोलिसांनी या मुलांना ‘चाइल्ड वेल्फेअर कमिटी’समोर हजर केले असता कमिटीने या मुलांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना उल्हासनगरमधील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
ठाण्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये कळवा स्थानकात १ ऑगस्ट रोजी ८ ते १० वयोगटातील पाच उत्तर भारतीय मुले प्रवास करत होती. या मुलांच्या चर्चेतून त्यांना पळून घरी जायचे असल्याचे त्याच डब्यातून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी रेल्वे पोलिस हेल्पलाइनशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.
रेल्वे पोलिसांनी डोंबिवली स्थानकात या पाच मुलांना उतरवले आणि त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी ही सर्व मुले बिहारमधील असल्याचे समोर आले. त्यांच्या पालकांनी त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरशात पाठवले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना मारहाण करत काम करून घेतले जात होते. याला कंटाळून त्यांनी तेथून पळ काढला. रेल्वे पोलिसांनी या मुलांना ‘चाइल्ड वेल्फेअर कमिटी’समोर हजर केले असता कमिटीने या मुलांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना उल्हासनगरमधील बालसुधारगृहात पाठवले. तसेच त्यांच्या पालकांशी संपर्क केला.
दरम्यान, या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलिस ठाण्यात मदरशातील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.