बळजबरीने हैदराबादेत विवाह अन् धर्मांतर; अमरावतीमधील पीडितेचा आरोप
धारणी येथील एका तरुणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेण्यात आले आणि हैदराबाद येथे बळजबरीने मौलानाच्या घरी विवाह करण्यात आला, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
रविराज
12 spt 2022
अमरावती : जिल्ह्यात आंतरधर्मीय विवाहाचे अजून एक प्रकरण समोर आले आहे. धारणी येथील एका तरुणीला प्रेम प्रकरणातून पळवून नेण्यात आले आणि हैदराबाद येथे बळजबरीने मौलानाच्या घरी विवाह करण्यात आला, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या तरुणीला पोलिसांच्या मदतीने धारणी येथे परत आणण्यात आले आहे.
मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्मपरिवर्तनसाठी प्रवृत्त केले. तसेच गोमांस खाण्यासाठी बळजबरी केली जात होती, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आईला फोन केला. तीन दिवसांपूर्वी नातेवाईकांनी तिची सुटका करून तिला घरी आणले. या युवतीला पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र, धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला, असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला.