Sanjay Raut : ‘शिंदे-भाजपचे काही निर्णय चांगले’, जेलमधून आल्यानंतर संजय राऊत नरमले?
Ravi Raj 10 NOV 2022
मुंबई, 11 नोव्हेंबर : मागच्या 100 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये असलेल्या संजय राऊत यांना बुधवारी जामीन मिळाला, यानंतर ते आर्थर रोड जेलमधून बाहेर आले. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. या भेटींनंतर संजय राऊत नरमले का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
आज शरद पवारांची भेट घेतली. पवार साहेबांनी माझी आणि माझ्या कुटुंबियांची चौकशी केली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही भाजपविरोधात नाही. ही यात्रा देशातील सर्व लोकांना एकत्र जोडण्याची आहे. भारत जोडो एक आंदोलन आहे. या देशातली कटुता नष्ट करण्यासाठी ही यात्रा आहे. भाजपने सुद्धा या यात्रेचं स्वागत करावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
‘शिंदे आणि भाजप सरकारने काही चांगले निर्णय घेतले, त्याचं मी स्वागत करतो. मी माझ्या काही कामांबाबत देवेंद्र फडणवीस यांना भेटून बोलणार आहे. संसदेत अधिवेशन सुरू असताना मी पंतप्रधानांना सुद्धा भेटणार आहे,’ असं राऊत म्हणाले.
‘मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे,’ असं राऊतांनी सांगितलं.
‘गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती. तसंच पोलिसांचेही काही प्रश्न आहेत, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत,’ त्यामुळे त्यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.