नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे”; सुषमा अंधारेंचे खळबळजनक विधान
सुषमा अंधारे यांच्या या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. या दाव्यासह सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.
Ravi Raj 4 Dec 2022
उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात असताना सुषमा अंधारे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या भंडारा जिल्ह्यात सभेला संबोधित करत होत्या.
“एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली,” असे मोठे विधान सुषमा अंधारे यांनी केले.
“उद्धव ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरून उतरत होते. ते बघून माझी आई रडत होती. एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला, असे माझी आई म्हणत होती. तेव्हाच मी उद्धव ठाकरे यांना साथ दिली पाहिजे, असे माझ्या मनात आले. आता आपण लढायचे ठरवले आहे,” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटातील कार्यकत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.