INDIA NEWS

Press

अधिकारी- पदाधिकाऱ्यांचा नाही मेळ…नरनाळा महोत्सव सपशेल फेल !

salim khan 16 February 2026

संस्कृतीच्या नावावर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आदिवासींवर अन्याय, नियोजन शून्य, जीव धोक्यात; प्रशासनाचा भोंगळ कारभार पूर्णतः चव्हाट्यावर

Akot: ऐतिहासिक नरनाळा किल्ल्याच्या साक्षीने मोठ्या गाजावाजात आयोजित करण्यात आलेला नरनाळा महोत्सव प्रत्यक्षात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा, बेजबाबदारपणाचा आणि दिखावूपणाचा जिवंत नमुना ठरला आहे. अधिकारी-पदाधिकारी यांच्यात कोणताही मेळ नसल्याचे चित्र सलग दुसऱ्या दिवशीही स्पष्ट झाले असून “महोत्सव” हा शब्दच नागरिकांसाठी त्रासदायक अनुभव ठरला आहे.

काल पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता सुरू होणारा मुख्य कार्यक्रम थेट साडेआठ वाजता सुरू झाला. तीन तास नागरिकांना ताटकळत ठेवून आयोजक मात्र व्हीआयपींच्या स्वागताच्या तयारीत मग्न होते. वेळेचे भान नाही, जबाबदारीची जाणीव नाही,असा संतप्त सूर उपस्थितांतून उमटला. अनेकांनी कंटाळून कार्यक्रमस्थळावरून माघार घेतली. “वेळ पाळता येत नसेल तर जाहिरातींचा दिखावा कशासाठी?” असा थेट सवाल करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर सकाळी १० वाजता होणारी चित्रकला स्पर्धा ११ वाजूनही सुरू झाली नाही. कडक उन्हात लहान मुलांना बसवून ठेवण्यात आले. सावलीची, पिण्याच्या पाण्याची किंवा प्राथमिक सोयींची व्यवस्था नसल्याने पालकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. बालस्पर्धकांच्या आरोग्याशी खेळणारे हे जीव घेणे नियोजन नेमके कुणाच्या आदेशावर झाले, याची चौकशी होणार का?

महोत्सवाच्या नावाखाली आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत तर धक्कादायक निष्काळजीपणा समोर आला. रुग्णवाहिका, वैद्यकीय पथक किंवा आपत्कालीन व्यवस्था नसताना शेकडो स्पर्धकांना धावण्यास लावण्यात आले. एका महिला स्पर्धकाला धावताना त्रास होऊन ती कोसळली आणि तब्बल वीस मिनिटे ती एकाच ठिकाणी पडून राहिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्या काळात तातडीची मदत उपलब्ध नव्हती, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराची साक्ष देणारी आहे. स्पर्धकांच्या जीवाशी खेळ करून कार्यक्रमाचे यश मिरवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा थेट आरोप होत आहे.

इतकेच नव्हे तर स्पर्धा सुरू असताना त्याच मार्गावरून अवजड वाहने ये-जा करत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वाहतूक बंदोबस्ताचा पूर्ण अभाव आणि सुरक्षेची बेफिकिरी यामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर जबाबदारी कोणाची, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने अकोट-पोपटखेड मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुकीचा खोळंबा, नागरिकांची गैरसोय आणि नियोजनशून्यता, या सगळ्यामुळे महोत्सवाऐवजी गोंधळाचा उत्सवच साजरा होत असल्याची भावना व्यक्त झाली.

वृत्त संकलनासाठी आलेल्या पत्रकारांना व्हीआयपी पास नसल्याच्या कारणावरून दूर ठेवण्यात आल्याने कार्यक्रमाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कार्यक्रमासाठी शेत उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रवेशात अडथळे आल्याने “जमीन आमची, मान तुमचा?” अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली. स्थानिक आदिवासी बांधवांनाही अपेक्षित स्थान न दिल्याचे आरोप पुढे येत आहेत.

इतिहास आणि पर्यटनाच्या नावाखाली आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव प्रत्यक्षात प्रशासनाच्या अपयशाचा जाहीर सोहळा ठरत आहे. वेळेचे नियोजन कोलमडले, सुरक्षेचे निकष पायदळी तुडवले गेले, माध्यमांना अडवले गेले आणि स्थानिकांना दुय्यम स्थान देण्यात आले,या सर्व घटनांमुळे अधिकारी-पदाधिकारी यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे सर्व गंभीर प्रकार व संस्कृतीच्या नावावर झालेला करोडो रुपयांचा भ्रष्टाचार हा बाहेर येऊ नये म्हणून माध्यमांना व त्यांच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी आदिवासींच्या नावावर ही स्टंटबाजी केली असून पूर्णपणे अयशस्वी झाल्याचे चित्र आहे त्यामुळे आता या सर्व प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होणार का?

अशी मागणी जोर धरत असून दोषींवर ठोस कारवाई होणार का? की पुन्हा एकदा आश्वासनांच्या पडद्यामागे सर्व काही दडपले जाणार? या महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृतीच्या व आदिवासींच्या नावावर कुणाचे खिसे भरण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे हे मात्र स्पष्ट दिसून येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish