Ajit Pawar : अजित पवार पुन्हा नाराज? शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला गैरहजर
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन सध्या शिर्डीत सुरू आहे. परंतु, या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज अजित पवार शिबीराला उपस्थित राहिले नाहीत.
RaviRaj 5 Nov 2022
शिर्डी : शिर्डीतील राष्ट्रवादीच्या (NCP) शिबीराला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) गैरहजर आहेत. कालच्या भाषणानंतर ते आज दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाला आले नाहीत. वैयक्तिक कार्यक्रमामुळे अजित पवार शिबीराला आले नाहीत असे बोलले जात आहे. परंतु,अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचं राज्यस्तरीय अधिवेशन सध्या शिर्डीत सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या शिबीरात काल अजित पवार यांचं जवळपास दीड तास भाषण देखील झालं. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले. शिवाय आज ते शिबीराला उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयातून थेट शिबीराला हजेरी लावली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रय्त केला. परंतु, अजित पवार या शिबीराला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत आता चर्चांना उधाण आलंय.
गेल्या काही दिवांसपूर्वी झालेल्या दिल्लीच्या शिबीरातूनही अजित पवार निघून गेले होते. या शिबीरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाआधीच अजित पवार निघून गेले होते. परंतु, यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. जयंत पाटील यांचं भाषण सुरू झाल्यामुळे ते उठून गेले नव्हते अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली होतं. परंतु, आज देखील जयंत पाटील यांचं भाषण होतं आणि आज अजित पवार शिबीराला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या गैरहजेरीवरून चर्चा होत आहेत. अजित पवार हे पक्षावर नाराज असल्यांच बोललं जातंय.
वैयक्तिक कारणामुळे गैरहजर
अजित पवार हे त्यांच्या एका वैयक्तिक कार्यक्रमाला गेल्याची माहिती मिळत आहे. शिवाय शरद पवार यांची परवानगी घेऊनच चे कार्यक्रमाला गेल्याचे सांगितले जात आहे. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत असलेले शरद पवार शिबीराला उपस्थित राहतात आणि अजित पवार यांचा असा कोणता कार्यक्रम होता, ज्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, काल अजित पवार यांनी शिबीरात कार्यकर्त्यांना बोंधित करताना राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पक्ष बदलणे चूक नाही. आपला पक्ष बदलून वेगळे होऊन मुख्यमंत्री होणे गैर नाही, पण ज्या घरात वाढलो ते घर उध्वस्त करणे ही बेईमानी आहे, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तुम्ही एकटे लढायचे यासाठी तयारी करा. आपली ताकत असेल तर मित्रपक्ष चर्चा करतील, असंही अजित पवार म्हणाले होते.