अकोला: अकोट रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधांचा अभाव-संपूर्ण रेल्वे स्टेशन अंधारात..
अकोट रेल्वे स्टेशन वर जाण्याकरिता रात्रीच्या वेळी संपूर्ण काळोख व अंधारातून मोबाईल टॉर्च च्या प्रकाशामध्ये मार्ग काढत लहान मोठ्यांपासून व प्रौढ व्यक्तींना सुद्धा गडद असलेल्या काळोखांमध्ये चाचपडत अकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचावे लागते
Ravi Raj 23 nov 2022.
अकोट: मागील गेली अनेक वर्षापासून अकोट अकोला रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रलंबित होती त्यामध्येच अकोट अकोला मुख्य वाहतूक असलेला महामार्ग गांधीग्राम येथील पूर्णा नदीवरचा पूल त्याला तडा गेल्याने अचानक अकोला कडे जाणारी सर्व वाहतूक मागील दोन महिन्यापासून बंद पडली आहे त्यामुळे अकोट अकोला रेल्वे सुरू करण्याची मागणी सर्व स्तरांवरून जोर धरू लागली होती. तसेच रेल्वे सुरू करण्यापलीकडे प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नव्हता म्हणून आज अतिशय घाईघाईने व खूप मोठा गाजावाजा करीत रेल्वे प्रशासनाने अकोट अकोला पॅसेंजर सुरू केली त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.अश्विनी वैष्णव मा रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक लोकप्रतिनिधी व दिग्गज नेत्यांकडून हिरवी झेंडी दाखवून रेल्वे सुरू करण्यात आली. परंतु अकोट रेल्वे स्टेशन येथे अत्यंत आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या व प्राथमिक मूलभूत सुविधा प्रवाशांकरिता उपलब्ध च नाहीत. अकोट रेल्वे स्टेशनवर स्टेशन प्रबंधक किंवा इतर कोणताही रेल्वे कर्मचारी व अधिकारी उपलब्ध नाही. अकोट रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना तिकीट देण्याकरिता तिकीट सुद्धा अकोला रेल्वे स्टेशन वरून मागवण्यात येत आहे. रेल्वे तिकीट केबिन उपलब्ध नाही चौकशी केबिन सुद्धा नाही अशा अनेक प्रकारच्या मूलभूत सुविधा अकोट रेल्वे स्टेशनवर उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा कारभार हा भगवान भरोसे आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावांमध्ये अति- घाई घाईने घेतलेला निर्णय हा भोंगळ व संपूर्ण अनयोजित असून फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधींचे वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न असल्याचे दाखवल्या जात आहे.
रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्मवर पेवर ब्लॉक खुले व उघड्यावर..
अकोट रेल्वे स्टेशन वरील प्लॅटफॉर्म वरील लाईट लावलेली नाहीत संपूर्ण प्लॅटफॉर्मवर अंधार व गडद काळोख असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर मधोमध असलेले पेवर ब्लॉक चे गड्डे खुले ठेवलेले आहेत त्यामध्ये प्रौढ व्यक्ती पासून तर लहान मुलांपर्यंत पडून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच प्लॅटफॉर्म किंवा रेल्वे स्टेशनवर कोणतेही आरपीएफ ची व्यवस्था उपलब्ध नाही रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंग झोन मध्ये व प्लॅटफॉर्मवर सुद्धा संपूर्ण अंधार असल्यामुळे उभी असलेल्या गाडीमध्ये बसण्याकरिता प्रवाशाला मोबाईल टॉर्च चा उपयोग घ्यावा लागतो त्यामुळे अकोट रेल्वे स्टेशन हे भगवान भरोसे सुरू आहे कुठलाही जबाबदार अधिकारी कर्मचारी किंवा आरपीएफ येथे उपलब्ध नाही व अत्यंत महत्त्वाच्या गरज असणाऱ्या सुविधा अकोट रेल्वे स्टेशनवर उपलब्ध नसल्यामुळे लोकप्रतिनिधींना रेल्वे सुरू करण्याच्या निमित्ताने फक्त आणि फक्त स्वतःचा गाजावाजा करून अकोट मधील जनतेवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मूलभूत अति महत्त्वाचे असलेल्या सुविधांकडे दुर्दैवाने दुर्लक्षित गेल्या गेले आहे की जाणून-बुजून अकोट वासियांचा रेल्वे प्रशासन अंत पाहत आहे. असे अनेक प्रश्न व रेल्वे प्रशासनाच्या बाबतीत जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.