अकोल्याचे गजानन घोंगडे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान..
अकोला अकोट तेल्हारा साडेचार तासात पोहोचून दाखवा!
Raviraj 7 Dec 2022
ग्राफिक्स डिझायनर गजानन घोंगडे
अकोला : काल परवा झालेल्या समृद्धी एक्सप्रेस चा पाहणी दौरा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला या दौऱ्यामध्ये नागपूर ते शिर्डी पर्यंतचा संपूर्ण प्रवास साडेचार तासात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पूर्ण केला विशेष म्हणजे या संपूर्ण साडेचार तासांचा प्रवास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत पूर्ण केला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
परंतु एकीकडे एवढा मोठा वाजा गाजा करीत असताना दुसरीकडे अकोला जिल्ह्यातीलच अकोला ते अकोट, हिवरखेड ते तेल्हारा, या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झालेली आहे. अकोट अकोला व हिवरखेड तेल्हारा या रस्त्यांची कामे मागील सात वर्षापासून सुरू आहे परंतु अजून पर्यंत कोणताही रस्ता पूर्ण झालेला नाही. याकरिता अनेक आंदोलने होऊन सुद्धा लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यावर काहीच फरक पडत नाही. आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमध्येच नाहीतर संपूर्ण देशामध्ये सुद्धा एवढा खराब रस्ता पहायला मिळणार नाही. तेल्हारा व अकोट तालुक्यातील लोकांची सहनशक्ती आता संपलेली आहे “त्यामुळे आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात राहायचे नाही अशी मानसिकता जन माणसांमध्ये निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही राज्यात जाण्यास तयार आहोत” अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील दहा वर्षापासून अकोट मतदार संघाचे अनुभवी व स्वतःला विकास महर्षी म्हणून घेणारे माननीय आमदार प्रकाश भारसाकळे यांचे अकोट तेल्हारा मतदार संघाकडे सतत दुर्लक्ष असल्यामुळे कोणतेही विकास कामे होत नसून अतिशय आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत व त्यापासून जनता वंचित आहे. स्वतःच्या मूलभूत हक्क व अधिकारासाठी किती संघर्ष करायचा? असे अनेक प्रश्न जन माणसांमधून येत आहेत
तसेच संपूर्ण आयुष्य स्वतःच्या हक्कासाठी देशाला स्वातंत्र्य मिळून आपण अमृत महोत्सव साजरा करीत असून सुद्धा आजही आंदोलने उपोषणे करावी लागतात. तरीसुद्धा प्राथमिक मूलभूत अधिकार हे मिळत नाहीत. रस्ते वीज पाणी या अतिशय महत्त्वाच्या गरजा पूर्ण होण्याकरिता सतत अकोट तालुक्यातील लोकांना संपूर्ण आयुष्यभर झगडावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील नामांकित ग्राफिक्स डिझायनर गजानन घोंगडे यांनी तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समृद्धी एक्सप्रेस वरचा हा सहाशे किलोमीटर प्रवास आपण साडेचार तासात पूर्ण केला परंतु अकोला जिल्ह्यातील अकोट हिवरखेड तेल्हारा हा फक्त सत्तर किलोमीटरचा प्रवास साडेचार तासात पूर्ण करून द्यावा असे खुले आव्हानच दिले आहे. व हे आव्हान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारावे अशी कठोर भूमिका व्यक्त केली आहे. एवढी दुर्दशा विद्यमान सरकारमधील निष्क्रिय लोकप्रतिनिधी मुळे अकोट मतदार संघाची झाली आहे अकोट मतदार संघाला कोणीही वाली राहिलेला नाही. तसेच गजानन घोंगडे यांनी दिलेलं आव्हान हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारावे व अकोला अकोट तेल्हारा हा प्रवास साडेचार तासात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी करून दाखवावाच अशी मागणी सर्व स्तरांवरून होत आहे.