Akola: अकोटच्या दिव्यांग धीरजची श्रीनगर-कन्याकुमारी सायकल वारी! स्पर्धेत भारतातील एकमेव दिव्यांग..
RaviRaj 1 March 2023
Akot : एक हात व पाय नसतानाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करीत अकोट येथील २३ वर्षीय धीरज बंडू कळसाईत हा युवक रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत काश्मीर-कन्याकुमारी सायकल वारी करीत आहे
अकोट :एक हात व पाय नसतानाही आत्मविश्वास, जिद्द व चिकाटीच्या भरवशावर दिव्यांगत्वावर मात करीत अकोट येथील २३ वर्षीय धीरज बंडू कळसाईत हा युवक रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेत काश्मीर-कन्याकुमारी सायकल वारी करीत आहे. तो १ मार्च रोजी श्रीनगर लाल चौकातून निघाला.
धीरज हा अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असून, काश्मीर-कन्याकुमारी हे ३६५१ किमीचे अंतर अवघ्या काही दिवसांत कापून गिनीज बुकात त्याच्या विक्रमाची नोंद व्हावी, असे ध्येय उराशी बाळगून आहे. त्याच्या या मोहिमेत अनेकांनी मदतीचा हात देत धीरजचे मनोबल वाढविले. अकोट येथील धीरज कळसाईत याने या मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी दररोज ३०० किमी सायकलिंगचा सराव केला आहे. श्रीनगरमधून निघालेल्या या सायकलिंग स्पर्धेत धीरज भारतातील जवळपास ११ राज्य व २५ महत्त्वपूर्ण शहरातून जाणार आहे. सायकलिंग करीत सोसाट्याचा वारा, खडतर मार्ग व आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन नेत्रदीपक कामगिरीकरिता निघाला आहे.
दररोज रात्रंदिवस सायकलिंग करीत असतांना धीरजवर थेट सॅटेलाइट तसेच इतर यंत्रणेद्वारा लक्ष ठेवल्या जाणार आहे. धीरजच्या या मोहिमेत लोकजागरसह विविध शहरांतील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत स्वप्न पूर्ततेकरिता सहकार्य केले. या मोहिमेत संपूर्ण भारतातून जलदगतीने सायकलिंग करणारे विविध क्षेत्रांतील स्पर्धक सहभागी झाले आहेत. मात्र, एक हात आणि पाय नसलेला महाराष्ट्रातील धीरज कळसाईत हा एकमेव स्पर्धक आहे. धीरज सोबत या स्पर्धेत सहायतेकरिता टीम लीडर म्हणून राजीक अली यांच्यासह अर्चना गडधे, विशाल सुभेदार व प्रफुल्ल गिरी सोबत आहेत.