“अकोटात बिल्डर माफियांचा भंडाफोड ! ” मुन्ना उर्फ शशिकांत अग्रवाल नंतर आणखी एका बिल्डर तथा शाळा संचालकावर महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप..
salim khan 9 October 2025

गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मुन्ना अग्रवालवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल.. अग्रवाल फरार.. बुलढाणा पोलिसांकडून लवकरच अटक
बुलढाणा/अकोट
अकोट शहरात एकामागून एक उघडकीस येणाऱ्या बिल्डर घोटाळ्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अलीकडेच नामांकित गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल याच्यासह दोन अज्ञात इसमांविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणात बी.एन.एस. 2023 कलम 115(2), 352, 3(5), 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून, अग्रवालसह इतर आरोपींचा पोलीसांकडून कसून शोध सुरू आहे. सध्या अग्रवाल फरार असून, शेगाव पोलीस त्याचा रात्रंदिवस शोध घेत आहेत.
या घटनेची पार्श्वभूमी अत्यंत गुंतागुंतीची आहे. अकोटातील क्लब माफिया टोळी ज्यामध्ये शिंदे सेनेचा उपजिल्हाप्रमुख मनिष कराळे, वरली किंग राजेश साळुंके आणि प्रसन्न जवंजाळ यांचा समावेश आहे यांनी 20 ऑक्टोबर रोजी येवदा पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेला तिच्या पतीसमोर मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गंभीर गुन्हे नोंदवले गेल्यानंतर या माफियांना वाचवण्यासाठी सुमित उर्फ विकी वानखडे आणि नंतर मुन्ना अग्रवाल यांनीही पीडित महिलेला धमकावल्याचे समोर आले आहे.

या सर्व प्रकारानंतर आता शहरातील इतर बिल्डरांच्याही हालचालींना वेग आला आहे.
अकोटातील आणखी एका नामांकित बिल्डर आणि शाळा संचालकाविरोधात महिला कर्मचाऱ्यांचे व शिक्षिकांचे शोषण केल्याचे धक्कादायक आरोप समोर आले आहेत.
संबंधित व्यक्तीने काही महिलांना कायमस्वरूपी नोकरीचे तसेच आर्थिक प्रलोभनाचे आमिष दाखवून वैयक्तिक पातळीवर त्रास दिला, असा आरोप स्थानिक वर्तुळात चर्चेत आहे.
या बिल्डरची पार्श्वभूमी पाहता, पूर्वीही अशाच स्वरूपाचे प्रकार घडल्याची चर्चा सुरू असून, काही प्रभावशाली मंडळींनी मध्यस्थी करून अनेक महिला शोषणाचे प्रकार दाबल्याचे बोलले जात आहे.
मुन्ना अग्रवालवरील गंभीर गुन्ह्यानंतर इतर बिल्डरांच्या कारवायाही उघड होत आहेत.
अकोटातील प्लॉट माफिया, बिल्डर लॉबी आणि व्हाईट कॉलर भ्रष्ट नेटवर्क यांच्यावर आता कायद्याची तांत्रिक तलवार लटकू लागली आहे.

बदनामीच्या भीतीने यापूर्वी गप्प बसलेल्या महिलांनी आता “आम्हाला न्याय हवा” अशा आवाजात उभे राहण्याची तयारी दर्शवली आहे.
शहरात सुरू असलेले बिल्डर-माफिया-राजकीय गठजोड, पैशाच्या बळावर समाजात मिरवणूक करणारे तथाकथित “भव्य” चेहरे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
मुन्ना अग्रवालसह अन्य आरोपींना अटक झाल्यानंतर अकोट, अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांतील संपूर्ण नेटवर्कचा भंडाफोड होण्याची शक्यता आहे.






