ॲम्बुलन्स अकोट वरून अकोला एका तासात कशी पोहोचणार.. वेळेअभावी जीवित हानी झाल्यास याला कोण जबाबदार ?
अकोला : खासदार आमदार पत्र देऊन झाले मोकळे, खासदाराचे रेल्वे प्रशासनाला पत्र व दूरध्वनीद्वारे बोलणे झाल्यानंतरही रेल्वे सुरू करण्याकरिता रेल्वे कडून प्रतिसाद नाही, दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण, पालकमंत्र्यांनी सुद्धा सोडले जिल्ह्याला वाऱ्यावर, भाजपची सत्ता स्थानिक राज्यात व केंद्रात असताना सुद्धा लोकप्रतिनिधीचे अस्तित्व व वजन शून्य, पालकमंत्र्याकडे वित्त खाते असताना सुद्धा कामाला गती नाही..
Ravi Raj 4 Nov 2022
अकोट : अकोला महामार्ग गांधीग्राम येथील पूल मागील पंधरा दिवसापासून दळणवळण व सर्व प्रकारचे वाहतुकीकरिता बंद आहे त्यामुळे जिल्ह्याला खूप मोठा ग्रामीण विभाग हा जोडणारा मुख्य रस्ता आहे परंतु प्रशासनाच्या सततच्या दुर्लक्षित व ढिसाळ नियोजनामुळे वाहतुकीचे कुठलेही पूर्वनियोजन नसताना अचानक गांधीग्राम येथील पुलाला तडे गेल्यामुळे अकोट -अकोला महामार्ग बंद करण्यात आला आहे परंतु विद्यमान सरकारमधील जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदार व खासदार तसेच पालकमंत्री सुद्धा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री असूनही गेली पंधरा दिवसापासून कोणत्याही प्रकारचा तोडगा या अति महत्त्वाच्या समस्येवर निघालेला नाही .
आमदार लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्र शासन व रेल्वे प्रशासनाला तात्काळ रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्याची पत्र पाठवून खूप मोठी तत्परता दाखवली आहे पण त्याचा काही उपयोग होणार नाही याचे कारण जिल्ह्यातील लहान मोठे अशिक्षित व सुशिक्षित सर्वच लोकांना माहिती आहे आणि हे आमदार लोकप्रतिनिधींना सुद्धा माहिती आहे तरी मग हा सर्व खटाटोप कशाला ? गांधीग्राम पुलांमुळे अनेक समस्या अनेक लहान-मोठे व्यवसाय रोजगार ठप्प झाले आहेत वाहतूक समस्या खूप मोठी निर्माण झालेली आहे नागरिकांना खूप मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे परंतु सर्वात महत्त्वाची ॲम्बुलन्स सेवा विस्कळीत झाली आहे मागील ६ वर्षापासून अकोट अकोला महामार्गाचे काम सुरू आहे ते भविष्यात कधी पूर्ण होईल हे कुणीच सांगू शकणार नाही त्यामध्ये आता ही गांधीग्राम पुलाची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या महामार्गाची दुरावस्था असूनही अकोट वरून ॲम्बुलन्स ही एका तासात अकोला पोहोचत होती परंतु आता ॲम्बुलन्स ही दर्यापूर मार्गे अकोला जात असल्यामुळे एक ते दीड तास अकोला पोहोचण्यास उशीर होतो त्यामुळे पेशंट दगावण्याची शक्यता ही जास्त असते तशा प्रकारची एक घटना किनखेड या गावात झाली सुद्धा आहे. या सर्व प्रकाराला लोकप्रतिनिधी किंवा प्रशासकीय अधिकारी हे जबाबदार आहेत की आपण सामान्य नागरिक याला जबाबदार आहोत ? मागील ६ वर्षापासून अकोट अकोला महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे अगोदरच सामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे पण आता हा त्रास सहन करण्या पलीकडे जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊनही जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य, रस्ते हे अति महत्त्वाचे प्रश्न असूनही आज याकरिता आंदोलन उभे करायचे की रास्ता रोको, आमरण उपोषण किंवा अजून कुठल्या मार्गाने हक्क मिळवता येईल असा गोंधळ सुरक्षित व पुढील चांगले भविष्य व दोन वेळच्या जेवणाकरिता धडपडणारा प्रत्येक सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे.
तसेच ॲम्बुलन्स सेवा ही अकोट अकोला एका तासात पोहोचायलाच हवी अन्यथा भविष्यात वेळे अभावी जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण व मृत्यू एवढा स्वस्त झाला आहे का? की निर्दयी सरकारला व सुस्त प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून अनेक निष्पाप लोकांचा जीव, बळी गेल्याशिवाय या समस्येवर तोडगा निघणार नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून जणू काही जीव गेल्याशिवाय प्रशासनाला व सरकारला जागच येत नाही की काय अशी परंपरा व इतिहास आज पावतो सामान्य नागरिक बघत आला आहे.
72 तासात ५० किलोमीटर मुर्तीजापुर अकोला महामार्ग तयार होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार करणारे अति विकसित व कमी वेळात देशात महामार्ग तयार होतील असे वेळोवेळी भाष्य करणारे मा. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी गांधीग्राम येथील मागील १५ दिवसापासून अति आवश्यक आरोग्य दळणवळण वाहतूक गरजा पूर्ण करणारा छोट्याश्या पुलाची निर्मिती करू शकले नाही किंवा या समस्येवर कोणताही तोडगा काढू शकले नाही विदर्भातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व खासदार संजय धोत्रे, जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चाळीस वर्षाचा दांडगा राजकीय अनुभव पाठीशी असलेले विद्यमान अकोट येथील मा. आमदार प्रकाश भारसाकळे त्यासोबतच अकोट मतदार संघाला जोडणारा अकोला पूर्व मतदार संघाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष व तडफदार नेतृत्व असणारे विद्यमान आमदार मा. रणधीर सावरकर यांचे अस्तित्व व राजकीय वजन या निमित्ताने जिल्ह्यातील नागरिकांना कळुन चुकले आहे व येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेच्या या सहनशक्तीचा परिचय निश्चितच या लोकप्रतिनिधींना होईल असा आक्रोश जन माणसांमध्ये निर्माण झालेला आहे तसेच खरोखरच प्रशासन व सरकार याबाबतीत गंभीर आहे का? की हा सर्व मानसिक त्रास जिल्ह्यातील जनता निवडणुका आल्या की विसरून जातील असे गृहीत धरूनच लोकप्रतिनिधी हे एकमेकांच्या कुरघोड्या करण्यात मग्न आहेत या महत्त्वाच्या विषयावर नागरिक किंवा लोकप्रतिनिधी कोणीही गंभीर होताना दिसत नाही त्यामुळे आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये जोडणारे रस्ते दोन वर्षात पूर्णत्वास गेले आहेत आपण अजूनही टपरीवर चहा पीत असताना गांधीग्राम चा पूल केव्हा चालू होईल अकोट अकोला रस्ता पूर्ण केव्हा होईल असा प्रश्न एकमेकांना विचारण्यातच धन्यता मानत आहोत..