लाडकी ‘बहिण’ थंडीत थरथरते…आणि देवा भाऊ मात्र गर्मीत फिरते!
Parmeshwar Patil 11 December 2025
हिंदुस्तान पेट्रोलियमची दादागिरी — अकोटकर उखडून फेकणार हुकुमशाही!
अकोट तालुक्यात दिवाळीपासून घरगुती गॅसचा असा महासंकट कोसळलं आहे की आज संपूर्ण तालुका एका सरकारी कंपनीच्या पायाशी अक्षरशः गुलामासारखा वाकून उभा आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या मनमानीचा एवढा कळस गाठला आहे की अकोटसारख्या शांत तालुक्यात आज असंतोष ज्वालामुखीप्रमाणे फुटत आहे.
दोन एजन्सी — धमाळ गॅस आणि भुईवर गॅस — दोन्हीकडे कुलूपांचे साम्राज्य, रिकामी गोदामे आणि हजारो नागरिकांची रोजची होणारी निर्दयी फसवणूक! पहाटेच्या अंधारात, कडाक्याच्या थंडीत, हातात रिकामे सिलेंडर घेऊन महिलांची, वृद्धांची, आजी आजोबांची अविरत रांग… आणि वरून कंपनीची उघडी दादागिरी.जणू युद्धकाळ सुरू आहे का?
गॅसची निर्मिती थांबलीय का?
अकोटवर जाणीवपूर्वक बहिष्कार टाकलाय का?जनतेच्या मनातील प्रश्न अंगारासारखे धगधगत आहेत. आणि प्रशासन?
ते फक्त पाहतोय, ऐकतोय, पण थंडगार बसलाय!

लाडकी ‘बहिण’ रांगेत उभी… सरकारचा मुखवटा फाटला!
ज्या सरकारने “लाडकी बहीण” म्हणत निवडणुकीपूर्वी घरोघरी मतांची भीक मागितली…
आज त्याच बहिणी थंडीने थरथरत अकोटच्या रस्त्यावर सहा-सात तास उभ्या!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस
— तुमच्या “लाडक्या बहिणी” आज चुल पेटवण्यासाठी धडपडत आहेत, हे दिसत नाही का?
१५०० रुपयांची फक्त कागदी घोषणा दिलीत, पण चुल पेटवायला गॅसच नाही!
लाकूड तोडायला बंदी, केरोसिनची मर्यादा, गॅस नाही —
घराघरात स्वयंपाकघर वाळून पडले, पण राजकारणात मात्र “विकास विकास”चे नारे!
जनतेची जळजळीत हाक
“मतांसाठी लाडकी बहीण आठवते… पण गॅस द्यायला विसरता? हा कसला विकास? हा कसला शासकीय जबाबदारीचा खेळ?”

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी म्हणजेच अकोटमधील ‘जुलूमशाही सरकार’
कंपनीचा कायदा वेगळाच!
कधीही पुरवठा बंद, कधीही सुरू… न नियम, न हमी, न शिस्त!
पहाटेपासून रांगा, थंडीचा चटका, त्रास,वृद्धांची स्थिति दयनीय, महिलांच्या डोळ्यात अश्रू, आणि कंपनीची निर्लज्ज मनमानी!
आणि प्रशासन?
एकही उपाय नाही, एकही ठोस पाऊल नाही, फक्त “बैठकींचे ढोंग”! अत्यावश्यक सेवेत इतके अपयशी पडूनही प्रशासन गप्प… कंपनीचा पाठीशी हात?
की जनतेचा जीव गुंडाळून फाईलमध्ये टाकलेला?
अकोटकरांचा रोष कडेलोटाला ‘कंपनी हटवा नाहीतर खडा निर्णय घेतला जाईल!’
अकोट तालुका पेटलेला आहे!
रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात एकच ज्वाला
“हुकूमशाही थांबवा, कंपनी हटवा, आमचा हक्क परत द्या!”
१. हिंदुस्तान पेट्रोलियमची अकोटमधून त्वरित हकालपट्टी करावी!
२. पर्यायी गॅस कंपनीची एजन्सी तात्काळ सुरू करावी!
३. गॅस पुरवठ्याची सरकारी हमी लागू करावी!
४. जनतेला छळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी!
जनतेचा आक्रोश आज प्रशासनाच्या दरवाज्याला हादरा देतोय,
“अत्यावश्यक सेवेत अपयशी ठरलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियमला अकोटमध्ये जागा नाही!”
“गॅस हवा म्हणजे गॅस, नाहीतर हिंदुस्तान पेट्रोलियम बाहेर!”
अशी स्पष्ट भूमिका आकोट करांनी घेतली आहे







