मुख्याधिकारी की हुकूमशहा, नगरपालिकेचा मनमानी कारभार
RaviRaj 24 March 2025
आठवडी बाजाराची दयनीय अवस्था, विक्रेत्यांची आरोग्य सुरक्षा वाऱ्यावर
विक्रेत्याची जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण ?
अकोट
दरवर्षीप्रमाणे अकोट नगरपालिका यावर्षी सुद्धा आठवडी बाजाराचा लिलाव करणार असल्याच्या सूचना जाहिरातीच्या माध्यमातून वारंवार वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत आहेत लिलावाची किंमत ही यावर्षी 12 लाख 28 हजार 700 रुपये ठेवण्यात आली आहे हा लिलाव झाल्यानंतर सदर ठेक्याची मर्यादा १ एप्रिल ते 31 मार्चपर्यंत ठरवून दिलेली असते याकरिता 27 मार्च ला हा लिलाव होणार आहे
परंतु लाखो रुपये एकाच वेळी घेऊन नगरपालिका आठवडी बाजारातील विक्रेते यांना मात्र वाऱ्यावर सोडून मोकळी होते अकोट सारख्या सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या आठवडी बाजारातील विक्रेते यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊले नगरपालिकेकडून उचलताना दिसत नाही आठवडी बाजारामध्ये घाणीचे साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे वर्षानुवर्षे ही घाण वाढत आहे
स्थानिक व्यापारी व फळभाज्या विक्रेते यांना या दुर्गंधीचा मानसिक त्रास होत असून आरोग्याच्या समस्या सुरू झाल्या आहेत अनेक विक्रेत्यांनी अकोट आठवडी बाजारात घाणीमुळे दुकान लावणे बंद केले आहे तर काही व्यापाऱ्यांना या दुर्गंधीमुळे अनेक आरोग्य विषयक गंभीर व्याधी सुरू झाल्या आहेत रविवारी बाजार असल्याने संपूर्ण दिवसभर या घाणी च्या दुर्गंधीमुळे भाजी विक्रेते व बाजार घेण्यासाठी आलेले नागरिक त्रस्त झालेले आहेत
त्यामुळे दिवसेंदिवस रविवारी बाजार घेण्यासाठी येणारे अकोटकर यांनी मात्र या दुर्गंधीमुळे पाठ फिरवली आहे या जीवघेण्या घाणीमुळे अनेकांचे जीवन उध्वस्त होत आहेत गोरगरीब विक्रेत्यांना कोणताही पर्याय नसल्यामुळे नाकाला बांधून अगरबत्ती लावून अशा वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत दिवसभर या जीव घेण्या दुर्गंधीमध्ये संसाराचा गाडा हाकण्यासाठी बसावे लागते आवश्यक सुविधा नगरपालिका देत नसून या जीवघेण्या दुर्गंधीचा कायमस्वरूपी बंदोबस्त जाणीवपूर्वक केल्या जात नसल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांकडून होत आहे
फक्त पैशाची वसुली केल्या जात असून गरिबांना माणूस न समजणारे मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे यांनी आपल्या एसी केबिन मधून बाहेर येऊन फक्त दहा मिनिटं या दुर्गंधी मध्ये उभे राहून बघावे अशा आक्रमक भावना भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत सोबतच आठवडी बाजारामध्ये सतत असलेली घाण व दिवसभर दुर्गंधी मध्ये साठवणूक केलेला भाजीपाला विकत घेऊन आरोग्य विषयक समस्येला फक्त आणि फक्त मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे हेच जबाबदार असून हुकुमशहा पद्धतीने हा कार्यभार सुरू असल्याच्या भावना आकोटकरांनी व्यक्त केल्या आहेत
प्रतिक्रिया
पावसाळ्यामध्ये एवढी घाण व दुर्गंधी होते की शब्दात सांगण्यासारखी नाही आठवडी बाजारामध्ये कोणत्याच प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे नागरिक व भाजी विक्रेते हे खूप नाराज आहेत यांच्याकडून पैसे वसूल करताना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो मी अनेक वेळा मुख्य मुख्याधिकारी डॉ.नरेंद्र बेंबरे यांना बाजारातील या सर्व समस्यांच्या बाबतीत चर्चा केली असता ‘मला ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत माझ्या खालच्या कर्मचाऱ्यांना सांगा “असे वारंवार अहंकारी उत्तर मिळाल्यामुळे मी सुद्धा हतबल झालेलो आहे
श्रीराम आढाऊ
आठवडी बाजार ठेकेदार अकोट