सत्ता, स्वार्थ, आणि ठेका, या ब्रिदवाक्यातून अकोट नगर परिषद ला बाहेर फेका..
parmeshwar Patil 13 November 2025

अकोट शहरात हिवाळ्याची चाहूल लागली असली तरी राजकारणाचं तापमान मात्र उसळलेलं आहे. महाराष्ट्रातील 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अकोटचं राजकीय समीकरण सर्वाधिक गाजतंय.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही
विकासाच्या नावाखाली अंधार आणि अतिक्रमण
अकोट नगरपरिषदेची निवडणूक यंदा विकासाच्या मुद्द्यावर रंगणार आहे. तुटलेले रस्ते, अस्वच्छता, तुटके स्ट्रीटलाईट, अतिक्रमण आणि गल्लीबोळात पसरणारा अंधार – नागरिक त्रस्त झाले आहेत.
मागील सत्ताकाळातील दुर्लक्ष, गटबाजी आणि अपूर्ण विकासकामांमुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर तीव्र आहे.
“बायको माझी लाडकी”चा राजकीय ट्रेंड
आरक्षणाच्या गुंतागुंतीत अडकलेल्या पुरुष उमेदवारांनी आता “बायको माझी लाडकी” या फॉर्म्युल्याचा अवलंब केला आहे. अनेक जण स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचं रक्षण करण्यासाठी पत्नींना उमेदवारी देत आहेत. काहींनी तर बायकोला पदोन्नती देत स्वतःला मागे घेतले आहे — राजकारणातील “घरगुती गठबंधन” यंदा विशेष गाजणार आहे.
काँग्रेस आणि वंचितची स्मार्ट चाल – भाजपची कोंडी
यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी उमेदवारांची नावे निश्चित करून भाजपची चांगलीच कोंडी केली आहे.
भाजप आतून हादरली असून, बंडखोरी होऊ नये म्हणून सावध भूमिका घेतली आहे. सूत्रांनुसार, भाजप अगदी शेवटच्या क्षणीच उमेदवार जाहीर करण्याची रणनीती आखत आहे, जेणेकरून नाराज गटांना वेळ मिळू नये.

पण तरीही निलंबन केलेल्या ११ कार्यकर्त्यांपैकी दोन कार्यकर्त्यांनी जबरदस्त पुनरागमन करून भाजपला मोठा धक्का दिला आहे.
मंगेश चिखले यांच्या पत्नी स्वाती चिखले यांनी थेट वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे तिकीट मिळवून भाजपच्या गोटात खळबळ उडवली आहे.
तर चंचल पितांबरवाले यांनी झोपलेल्या शिंदे सेनेला जागृत करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही थेट दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
या दोन्ही हालचालींनी भाजपमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला असून, इतर नऊ कार्यकर्ते सुद्धा यावेळी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात भाजपला फटका देण्याच्या तयारीत आहेत. स्थानिक स्तरावर हा बंडखोरीचा वादळ आणखी भडकण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी..
काँग्रेसमध्ये नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरूच आहे. अनेक इच्छुकांनी दावेदारी दाखल केली असून, गटबाजी उघड झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “एकजुटीने लढा द्या” असं आवाहन केलं असलं तरी प्रत्यक्षात काँग्रेसची अंतर्गत परिस्थिती गोंधळलेली आहे.
राष्ट्रवादीत गोंधळ आणि हकालपट्टीचा स्फोट..
अजित पवार गटात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अजित पवारांचे लाडके आ.अमोल मिटकरी यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिटकरी यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा मोहम्मद बद्रुजमा यांच्या हाती दिली होती, पण काहीच महिन्यांत परिस्थिती हाताबाहेर गेली.
दिग्गज नेते काशीराम साबळे यांनी पक्षात प्रवेश करून केवळ तीन दिवसांत पुन्हा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला, ज्यामुळे बद्रुजमा यांच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे “अजितदादांच्या सर्व ध्यानात राहतं!”
अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे

धार्मिक आणि राजकीय तापमान दोन्ही शिगेला
अकोटमध्ये सध्या संत नरसिंह महाराज यात्रा सुरू आहे, आणि त्याचवेळी नरनाळा महोत्सव पुन्हा सुरू करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.
धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा तिन्ही पातळ्यांवर अकोट पेटलेलं आहे. पोस्टरयुद्ध, सोशल मीडिया मोहिमा आणि सभांच्या गदारोळात मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत आहेत.
अकोट – जिल्ह्याचं राजकीय केंद्रबिंदू
अकोला जिल्ह्याचं राजकारण काही विशिष्ट नेत्यांच्या भोवती फिरतं, आणि त्यातील बहुतांश अकोटचेच. त्यामुळे अकोट नगर परिषदेची निवडणूक फक्त स्थानिक लढत नसून जिल्ह्याच्या राजकीय भवितव्याचा नकाशा ठरणार आहे.
भाजप सावध, काँग्रेस गोंधळलेली, राष्ट्रवादी गटांत विभागलेली, तर वंचित मात्र झपाटलेली —
अशा या तापलेल्या रणांगणात नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे ३ डिसेंबरलाच स्पष्ट होईल.
भाजपाला वोट चोरी शिवाय पर्याय नाही

मात्र ही सर्व घडामोड पाहता भाजप ला सत्ता टिकवायची असेल तर” वोट चोरी” शिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला दिसत नाही
तोवर अकोटमध्ये घोषणाबाजी, गटबाजी आणि राजकीय नाट्याचा महाअंतीम पर्व सुरुच…
“थंडी वाढतेय, पण राजकारण तापतंय – अकोटची रणसंग्रामाची सुरुवात झालीय!”







