Cotton : कापसाचा भाव घसरणार? काय आहेत कारणं, काय होईल परिणाम, तज्ज्ञांचा अंदाज काय..
Cotton : यंदा देशात कापसाचे उत्पादन चांगले असले तरी भावावर संक्रात येण्याची दाट शक्यता आहे..
Ravi Raj. 16 nov 2022
नवी दिल्ली : यंदा कापसाचे उत्पादन (Cotton Production) जोमात आहे. 344 लाख गाठीचं उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी हा आकडा, 307 लाख गाठी इतका होता. पण उत्पादन वाढले तरी गिऱ्हाईकची न मिळण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे. त्याला सर्व प्रकारची कारणे (Reasons) कारणीभूत ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं (Farmers) मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
यंदा हवामान अनुकूल नसतानाही उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले असताना ही कापसाचे उत्पादन वाढले आहे. गेल्यावर्षीपेक्षा 12 टक्के जास्त उत्पादन झाले आहे.
पण यंदा पिकाचा पेरा वाढल्याने त्याचा एकूणच उत्पादन वाढीवर परिमाण झाला आहे. यंदा 10 टक्के कापसाचा पेरा अधिक होता. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच यंदा कापसाची गुणवत्ताही चांगली आहे.
कापसाचे उत्पादन वाढण्याची जास्त शक्यता आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात भारतातील कापसाच्या गाठी या परदेशात निर्यात करण्यात येतात. पण यंदा भारतीय कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त असल्याने त्याचा फटका निर्यातीला बसत आहे.
नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत 70 टक्के कापसाची निर्यात करण्यात येते. पण यंदा आकडा गाठायला दमछाक होत आहे. यंदा भारतातील कापसाचे भाव जगभरातील कापसापेक्षा 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा CAI चे अध्यक्ष अतुल गनात्रा यांनी केला आहे.
या एका कारणामुळे कापसाच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम किंमतीवर होणार आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात होते. 60 टक्के कापसाच्या गाठी बांगलादेशात पाठविण्यात येतात. पण यंदा तिकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
चीनकडे भारत डोळे लावून बसला आहे. पण चीनी चलनाच्या तफावतीमुळे भारतीय कापसाला चीनमध्ये उठाव मिळणे अवघड आहे. तर इतर देशाचा कापसाचे भाव कमी असल्याने त्यांना जागतिक पातळीवर अधिक पसंती मिळत आहे.
गेल्यावर्षी, 2021-22 मध्ये 43 लाख कापसाच्या गाठींची निर्यात करण्यात आली होती. यंदा 2022-23 मध्ये केवळ 30 लाख कापसाच्या गाठींची निर्यात होण्याची भीती आहे. त्यामुळे देशातंर्गत कापसाचे भाव कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.