INDIA NEWS

Press

महाराष्ट्र अंधारात, अघोषित लोडशेडिंगमुळे जनता त्रस्त

Salim Khan 3 September 2025

ऊर्जामंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचे अपयश स्पष्ट, तरी भाजप सरकारवर जनतेची भिस्त..

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अघोषित लोडशेडिंगने जनतेचे जीवन विस्कळीत झाले असून, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ऊर्जामंत्री म्हणून गंभीर टीका होत आहे. सध्या गणेशोत्सवाचा कालावधी असून, राज्यभरात उत्सवाची धामधूम सुरू आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या आणि कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे नागरिकांचा आनंद मावळत आहे.

अकोला जिल्ह्यातील अकोट विभागात तर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. नागरिकांना तांत्रिक दुरुस्तीच्या कारणावरून रात्रभर अंधारात काढावे लागत असून, विद्युत वितरण कंपनीकडून याबाबत कोणतीही गंभीर दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

या अघोषित लोडशेडिंगमुळे केवळ उत्सवात अडथळे येत नाहीत, तर आरोग्यसेवा, रुग्णालये, आणि इतर अत्यावश्यक सेवा यांनाही मोठा फटका बसत आहे. अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी जागरण करत मुख्यमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्याच्या हंगामात विजेची मागणी तुलनेने कमी असते, तरीसुद्धा अशा प्रकारे जाणीवपूर्वक लोडशेडिंग करण्यात येत असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात येत आहे.

यामुळे सरकार जनतेला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना बळावली असून, यामागचा उद्देश नेमका काय आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

वीज ही मूलभूत गरज असूनही ती न मिळाल्याने, सध्याच्या सरकारबद्दल जनतेत तीव्र असंतोष पसरलेला आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा परिणाम निश्चित होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. तोपर्यंत अकोटकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या अघोषित लोडशेडिंगला तोंड द्यावे लागणार, ही खेदजनक बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish