गुजरात निवडणूकीचे वाजले बिगूल मोदी-शहांची लागणार कसोटी
Ravi Raj 5 Nov 2022
काँग्रेसची सहा दशके असलेली सत्ता अनेक कारणांमुळे 2014 च्या निवडणूकीत पराभूत झाली. आणि भारतीय जनता पक्षाचे मोदी सरकारचा देशात ‘उदय’ झाला. या सत्तांतरातून भारतीय जनतेच्या मनात अनेक आशा आकांक्षांनी जन्म घेतला. पाच वर्षाचा कालावधी हा अपूर्ण असतो म्हणून पुन्हा 2019 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले.
लोकसभेच्या या दोन निवडणूकीतील आठ वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. आता 2024 च्या निवडणूकांचे वेध सर्व पक्षांना लागले आहेत. परंतू मोदी पर्वाच्या या आठ वर्षात जेवढ्या घटना घडल्या तेवढ्या मागील 50 – 60 वर्षात देखील घडल्या नसल्याने गल्ली ते दिल्ली, व्हॉटअॅप ते प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वत्र एकच चर्चा दिसते, ती म्हणजे राजकारण. परंतू 2014 च्या निवडणूकीतील ‘वादा’ होता ‘विकासाचा’. नंतरच्या सात वर्षात विकास कुठेच सापडला नाही. परंतू हिंदूत्व मात्र मोठ्या प्रमाणावर अधोरेखीत झाले. सीएए, एनआरआय सारख्या कायद्यांपासून तर शाहिनबाग आंदोलनापर्यंत आणि अखलाक काय जेवतो ईथपासून तर बुलडोझर कार्यपद्धतीपर्यंत इतकेच नव्हे तर हिजाबपासून तर तीन तलाक पर्यंत आणि रोहिंग्याच्या गणनेपासून तर हजरत निजामुद्दीन मरकज मस्जीद मधील तबलिकी जमातीच्या बैठकीमुळे कोरोनाचा प्रसार झाला इथपर्यंतच्या घटनाक्रमांनी भारतीय अल्पसंख्याक समाजात असंतोष पसरला. तीन काळ्या शेतकरी कायद्यांमुळे देशातील शेतकरी प्रचंड नाराज झाला. दहा कोटी रोजगाराचे आश्वासन ‘एक चुनावी जुमला’ ठरला. नोट बंदी आणि काळा पैसा आणण्याची घोषणा पूर्णपणे फोल ठरली, देशाची अर्थव्यवस्था ढासळली आणि रूपया आजपर्यंत घसरतोच आहे. जीएसटीत 27 वेळा बदल केल्याने देशातील व्यापारी त्रस्त आहेत. दुध,पीठ मीठावर जीएसटी लावल्याने सामान्य माणसाची ‘भाकरी’ महागली आहे. तर गॅस, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमती सरकारच्या खोट्या आश्वासनांवर ‘शिक्कामोर्तब’ करणार्या ठरल्या. त्यातून मध्यम वर्गीय कुटूंबांचा महिन्याचा बजेट बिगडला. विरोधी पक्षांची सरकारे राज्यपालांच्या माध्यमातून पाडण्याचे प्रकार देशभर झाले. ईडी, सीबीआय, एआयएचा दुरूपयोग करून राजकारणात भितीचे वातावरण तयार केले. त्यामुळे राम मंदिर, महाकाल मंदिर, गंगेत डुबकीचा जो परिणाम व्हायला हवा होता आणि हिंदुत्वाची वोट बँक तयार व्हायला हवी होती ती झाली नाही. नेहरूंचा द्वेष आणि गांधी-पटेलांना काँग्रेस पक्षाकडून सुनियोजित पद्धतीने ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न हा देशातील बुद्धीवादी, समाजवादी, गांधीवादी व डाव्यांना आवडला नाही. देशात ‘सर्वधर्म’ समभावाची भावना निर्माण करण्याचा प्रश्नच नाही. परंतू जे वातावरण देशात होते ते सुद्धा कायम ठेवण्यात सरकार अपयशी ठरले. झुंडशाहीतून ‘असहिष्णू’ वातावरण तयार झाले. अशा सर्व पार्श्वभूमिवर आम आदमी पक्षाने पंजाब सारखे राज्य ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी यांनी जम्मू काश्मिरपासून काढलेली ‘भारत जोडो’ यात्रा देशभरात लोकप्रिय ठरत आहे. देशातील बुद्धीजीवी, समाजवादी विचारांचे शेकडो मान्यवरांसह देशातील दोन हजार पक्ष व संघटना या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. वाढलेली महागाई, शेतकर्यांचे प्रश्न, बेरोजगारी यावर ‘मन की बात’ होत नसल्याने 2014 मध्ये असलेल्या ‘हर घर मोदी’ लाटेला मोठ्या प्रमाणावर ‘अहोटी’ लागली आहे. सामान्य माणूस ज्याला ‘कॉमन मॅन’ म्हटले जाते तो सरकारच्या अजेंड्यावरून गायब झाला असल्याने आता ‘भक्तांची’ संख्या देखील दिवसागणीक घटते आहे. अशातच महाराष्ट्राचे सरकार पाडण्यात भाजपाला यश आले असून आता महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून खूप काही मिळेल असे वाटत होते, परंतू तसे काही झाले नाही. उलट महाराष्ट्रात आलेले वेदांता, एअरबस सारखे कोट्यावधीचे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला असता ते गुजरात राज्यात गेले. या प्रकल्पांवरून महाराष्ट्रात सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष असा वाद सुरू असतांना या प्रकल्पांचे प्रधानमंत्री आपल्या राज्यात उद्घाटन करत होते. आता दोन लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे. ज्यामध्ये एकही मोठ्या प्रकल्पाचे नाव नाही. रस्ते, महामार्ग, रेल्वे विस्तारीकरण अशा बाबींवर हा निधी खर्च होणार असल्याने महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात ‘धुळ’ फेकीची घोषणा करण्यात आली असल्याचा आरोप होतो आहे. परंतू महाराष्ट्र संवेदनशील आहे, संयमी आहे, बोलत नाही करून दाखवितो. महाराष्ट्रातील गुजरात राज्यात स्थानिक झालेले नागरीक किमान दहा विधान सभा क्षेत्रांवर परिणाम करतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने उशिरा का असेना गुजरातच्या निवडणूका घोषित केल्या आहेत. मागील सहा पंचवार्षिक मध्ये गुजरात राज्यात भाजपची सत्ता आहे. गुजरात राज्यातील व्यापारी, पाटीदार समाज, अल्पसंख्याक समाज प्रचंड नाराज आहे. भारत जोडो यात्रेमुळे गुजरात राज्यातील 62 विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार ताकदीने कामाला लागले आहेत. तर आम आदमी पक्षाने गुजरात राज्य ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. 182 जागा असलेल्या गुजरात राज्यात केवळ 111 जागांवर भाजपाला 2017 च्या निवडणूकीत यश मिळाले आहे. ज्या गुजरातच्या विकास मॉडेलवर भाजपाने देश ताब्यात घेतला ते राज्यच आता टिकविण्यासाठी ‘अस्तित्वाची लढाई’ भाजपाला लढावी लागणार आहे. या लढाईत प्रधानमंत्री मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची कसोटी लागणार आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेंव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) या संस्थेने गुजरात राज्यातील जनतेचा केलेला सर्वे हा या निवडणूकांमध्ये महत्वपूर्ण ठरणार आहे.