मुंबई :उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्ता विरोधातील याचिकेवर आज सुनावणी!
Uddhav Thackeray : शिवसेना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करताना, हे दुहेरी संकट त्यांच्यावर ओढवले आहे.
Ravi Raj 19 Oct 2022
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाची, चिन्हाची लढाई न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय न्यायालयाने देणे बाकी असताना, आता ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. ठाकरेंच्या विरोधातील या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. एकीकडे आधीच ठाकरे आणि त्यांची शिवसेना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करताना, हे दुहेरी संकट त्यांच्यावर ओढवले आहे, असे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मालमत्ते विरोधातील याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या मालमत्तेविरोधात उच्च न्यायालयात ही याचिका दाखल आहे. याचिकाकर्त्या गौरी भिडे यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका न्यायालयात दाखल केली होती. सदर याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान या आधीच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंच्या संपत्तीवरून त्यांच्यावर निशाणा साधला होता. गौरी भिडे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं उत्पन काय, सामानचं उत्पन्न काय, असं विचारण्यात आल्याचे, राणे म्हणाले होते.
करोनाचा कालावधी हा २०२०-२१ आणि २०२१-२२ दरम्यान होता. या कालावधीत महाराष्ट्रातील उद्योगधंदे डबघाईला आले. बेरोजगारी आली. भयावह अशी परिस्थिती आली. जवळजवळ सर्व कंपन्या बुडाल्या. असे असतानाही ‘सामना’ची एकूण उलाढाल मात्र तब्बल ४२ कोटींची होती,” असा सवाल राणेंनी उपस्थित केला होता.
न्यायालयात आज सुनावणी पार पडताना नेमका काय आदेश न्यायालय देणार, यात ठाकरेंना दिलासा मिळेल की मालमत्तेवर न्यायालय वेगळे काही निर्णय देईल, हे पाहणे, महत्त्वपूर्ण असणार आहे.