INDIA NEWS

Press

निष्पाप श्री सदस्यांच्या मृत्यूला कोण जबाबदार! -हा सर्व खटाटोप निवडणुका जिंकण्यासाठीच..

मुंबईतील खारघर येेथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 11 श्रीसदस्यांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. राजकीय अट्टाहासात ‘अकरा’ परिवार उध्वस्त झालेत. या निष्पाप श्रीसदस्यांच्या मृत्यूचे ‘पाप’ कुणाच्या डोक्यावर? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
Kailash akrte 17 April 2023

राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या आयएएस अधिकार्‍यांना ज्यांनी या 42 डिग्री सेल्सियस तापमानात कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यांना ‘लाज’ वाटायला हवी. एव्हढ्या मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करतांना त्या कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रम किती वेळ चालेल? याचा अंदाज आणि किती जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित राहील? याचा अंदाज बांधून या कार्यक्रमाचे नियोजन करायला हवे होते. वीस लाख श्रीसदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अचानक काहीतरी घडेल, अचानक गर्दी वाढली असे झाले नाही. 20 लाख भक्तगण येणार असा अंदाज आधीच वर्तविण्यात आला होता.

साडेदहा वाजता कार्यक्रम सुरू होईल अशी वेळ देण्यात आली होती. कार्यक्रम दोन-अडीच तास चालेल आणि कार्यक्रम संपल्यावर वीस लाख लोक बाहेर पडण्यासाठी किमान तीन ते चार तास लागतील हे ‘शेंबड्या’ पोरगासुध्दा सांगेल. असे असतांनासुध्दा सांस्कृतिक कार्य मंत्रालयातील आयोजन अधिकार्‍यांची ‘अक्कल गहाण’ ठेवली नसेल हे निश्चित. त्यांनी कार्यक्रमाचा अट्टाहास करणार्‍या ‘अती बुध्दीमान’ राज्यकर्त्यांना समजावून सांगण्याची गरज होती. आणि भर उन्हात कार्यक्रमाचे आयोजन होत असतांना मंडपाची व्यवस्था का करण्यात आली नाही? या कार्यक्रमासाठी 14 कोटींपेक्षा अधिक खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजून पाच कोटी खर्च झाले असते. परंतू सभामंडप आणि कुलरची व्यवस्था करण्याची ‘बुध्दी’ कुणालाही का सुचली नसावी? एव्हढे निर्बुध्द अधिकारी मंत्रालयात बसले असावेत याचे आश्चर्य वाटते. म्हणजे माणसांची ‘गर्दी’ ही आपली राजकीय ‘शान’ मारण्यासाठी असते का? जे मृत्यू झालेत त्या परिवराला आई कुठून मिळणार? सुर्य आग ओकत असतांना ज्यांना त्रास होत असेल त्यांनी मदत मागा, लागलीच मदत मिळेल असे आवाहन माईकवरून करण्याची आवश्यकता होती. परंतू सुर्य आग ओकत असतांना तुमची ‘अध्यात्मिक’ शक्ती फार मोठी आहे, सुर्य आग ओकतो आहे, परंतू कुणीही जागेवरून उठायला तयार नाही अशा चुकीच्या पध्दतीने भावनिक आवाहन करून श्रीसदस्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जात होते.

अकरा जणांचा मृत्यू ही सामान्य बाब नाही. परंतू पाच लाख रूपयांची मदत जाहीर करून आम्ही स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही पाच लाख रूपयांत एखाद्या लहानग्याला त्याची ‘आई’ परत आणून द्या, किंवा शिकत असलेल्या तरूणाला, लग्नाच्या तरूण मुलीला तिचा कमावणारा ‘बाप’ आणून द्या. या मृत्यूंची चुक तुम्हाला ‘माफ’ करणार नाही. या अकरा मृत्यूचे ‘पाप’ कुणाला तरी भरावे लागेल, हे लक्षात असू द्या. मागील दोन महिन्यांपूर्वी सिहोरच्या श्री पंडित मिश्रांनी देखील चुकीचा निर्णय घेतला होता. त्यांनी देशातील जनतेला सिहोर येथील रूद्राक्ष वाटण्याच्या कार्यक्रमाला बोलाविले होते आणि विविध राज्यातून भाविकगण लाखोंच्या संख्येने वाहनांसह मध्यप्रदेशकडे निघाले. हजारो वाहने सिहोरच्या रस्त्यावर अडकली. वाहने माघारी फिरायला देखील जागा उरली नाही. सर्व वाहने शेतांमध्ये घुसली, शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कसेतरी तीन दिवसांनतर ही मंडळी घरी परतली, याला काय म्हणणार? चुक भक्तांची की महाराजांची? दोष कुणाचा? परंतु सामान्य प्रशासन, पोलीस प्रशासनाची अक्कल ‘गहाण’ ठेवलेली असते का? महापुरूषांच्या जयंतीला रस्त्यावर स्टेजसाठी परवानगी दिली जाते. परंतू किमान दुसरा रस्ता तरी वाहतुकीसाठी मोकळा असावा इतकी साधी अक्कल ट्रॅफिक विभागाला नसेल का? परंतू स्टेजमुळे रस्ता अडविल्याने नागरिकांना कोणता त्रास होतो आहे यासाठी किमान वरिष्ठ अधिकार्‍यांनी तरी फेरफटका मारून तपासण्याची गरज असते. आजारी रूग्णांना ताबडतोबीने हॉस्पिटलला नेण्याची आवश्यकता असते, विद्यार्थ्यांना परीक्षेला जायचे असते. गरोधर मातेला डिलेव्हरीसाठी दाखल करावयाचे असते, कुठेतरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचायचे असते, अशावेळी रस्ते बंद असल्याने उशीर होतो आणि रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. परीक्षेला उशीर झाल्याने वेळेवर पोहोचता येत नाही. परंतू मृत्यूच ‘स्वस्त’ झाल्याने आता किती मेले? याचे दु:ख कुणालाही होत नाही. सामाजिक बांधिलकीचे ‘भान’ आम्ही विसरत चाललो आहोत. उत्सव साजरे करतांना त्या महापुरूषांचे विचार आम्ही डोक्यात घ्यायला तयार नाही. परंतू धुमधडाका आम्हाला प्रिय आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना कोणत्याही कार्यक्रमासाठी खुप वेळ मैदानावर बसवून ठेवता येवू नये असा शासन निर्णय झालेला आहे. परंतू अनेकवेळा त्याचे पालन हेातांना दिसत नाही. कारण येणारा पाहुणा देखील इतका ‘बिनडोक’ असतो की त्याला एव्हढी देखील अक्कल नसते की मुले आपल्यासाठी खुप वेळेपासून थांबली आहेत. वेळेवर न पोहोचणार्‍या अतिथीची वाट न बघता कार्यक्रम सुरू करा असे ‘संस्कार’ आमच्यावर स्व. प्रा. डॉ. मु. ब. शहा सरांनी केले आहेत. आणि वेळेचे महत्व नसेल तर अशी माणसे आयुष्यात कधीही ‘यशस्वी’ होऊच शकत नाही. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करणार्‍या राजकीय नेत्यांच्या आव्हानांना नागरिकांनी बळी पडू नये असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते. वेळेवर लग्ने लागत नाही, शक्तीचे प्रदर्शन केले जाते आणि श्रोत्यांना, दर्शकांना, नातलगांना वेठीस धरून त्यांना असह्य त्रास होईपर्यंत दखल घेतली जात नाही.

महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या मृत्यूंची दखल घेत राज्य सरकारने ‘पापक्षालन’ करण्याची आवश्यकता असून संपूर्ण श्रीसदस्यांसह राज्यातील जनतेची ‘माफी’ मागावी अशी जनभावना आहे. यावर यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी शासन निर्णय काढावा आणि अशा घटनेची पुनर्रावृत्ती झाल्यास कार्यक्रमाच्या आयोजकांवर ‘सदोष मनुष्यवधा’चे गुन्हे दाखल करावेत. अशी जनभावना व पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish