Maharashtra Karnataka Dispute : शरद पवारांच्या ४८ तासांच्या अल्टिमेटमवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले..
“महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना कोणीही करू नये आणि कोणी करत असेल तर …”असंही फडणवीसांनी सांगितलं आहे.
Raviraj 6 Dec 2022
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना आज घडली. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आज पत्रकारपरिषद घेत ४८ तासांचा अल्टिमेटमही दिला आहे. येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेवटी त्या भागात राहणारे आपली जे लोक आहेत ते नेहमीच आमच्या सगळ्यांच्या संपर्कात असतात. आमच्याशीही ते बोलत असतात. त्यांची सार्थ अपेक्षा असते की, आपल्या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे, आपण देतो देखील. पण मला असं वाटतं की ४८ तासांत शरद पवारांना त्या ठिकाणी जाण्याची वेळ काही येणार नाही. निश्चितपणे तिथलं सरकार, केंद्रसरकार आणि राज्य सरकार हे ही परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील लोकांनाही माझी विनंती आहे, की अॅक्शनला रिअॅक्शन दिली तर या गोष्टी वाढत जातील. या कोणाच्या हिताच्या नाहीत.”
याचबरोबर, शरद पवार म्हणतात सरकार गंभीर नाही, अन्य पक्षांशी चर्चा करत नाही, थेट निर्णय घेते आणि अंमलबजावणीही होत नाही. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “या सगळ्या गोष्टींची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेमुळेच झाली. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना चर्चेला बोलावलं. शरद पवारांनाही बोलावलं होतं. कदाचित प्रकृतीच्या कारणामुळे ते त्यावेळी येऊ शकले नसतील. कारण, सीमाप्रश्नामध्ये नेहमीच त्यांनी चांगलं लक्ष घातलेलं आहे. विविध पक्षाच्या लोकांना बोलावून आणि सीमा भागातील लोकांना बोलावून, पुढे काय करायचं याची चर्चा झाली. त्या चर्चेनंतरच मला असं वाटतं की एकप्रकारे त्याची रिअॅक्शन देणं, हे कर्नाटकने सुरू केलं.”
काय म्हणाले आहेत शरद पवार? –
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे,” असं शरद पवार आज पत्रकारपरिषदेत म्हणाले होते.
याशिवाय, “मला असं वाटतं की एखाद्या अॅक्शन रिअॅक्शन येते, पण महाराष्ट्र हे न्यायउचित आणि न्यापूर्ण अशाप्रकारचं राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणीही असं करू नये, असं माझं आवाहान असेल. महाराष्ट्र शेवटी देशात आपल्या न्यायप्रियतेसाठी ओळखलं जातं आणि अन्य राज्यांपेक्षा आमचं वेगळेपणही हे आहे, की महाराष्ट्रात कायद्याचं राज्य नेहमीच राहिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना कोणीही करू नये आणि कोणी करत असेल तर त्याला पोलीस रोखतील हेदेखील मी यानिमित्त सांगू इच्छितो.” असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
“मला असं वाटतं आणि कर्नाटक राज्यालादेखील माझं सांगणं आहे, की सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील सुनावणी सुरू असताना, कुठलही चिथावणीखोर वक्तव्य करणं किंवा तिथली परिस्थिती बिघडवणं, हे योग्य नाही. कायदेशीरही नाही आणि दोन्ही राज्यांच्या हिताचंही नाही.” असं शेवटी फडणवीस म्हणाले.