INDIA NEWS

Press

‘एक देश, एक पोलीस गणवेश’ यावर चर्चा करावी, मोदींचे राज्यांना आवाहन; बनावट बातम्यांपासून सतर्क राहण्याच्या सूचना

One Nation, One Police Uniform: गृह मंत्रालयाच्या ऑनलाईन चिंतन शिबिरात आठ राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबतच १६ राज्यांचे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते

Ravi Raj 28 Oct 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पोलिसांच्या गणवेशावर भाष्य केलं आहे. ‘एक देश, एक पोलीस गणवेश’ या संकल्पनेवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. “कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी आहे. मात्र ती देशाची एकता आणि अखंडतेशीदेखील जोडली गेली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

बनावट बातम्यांमुळे देशात वादळ निर्माण होऊ शकतं, त्यामुळे याबाबत सतर्कता बाळगावी लागेल. आपल्याला लोकांना काहीही फॉरवर्ड करण्यापूर्वी विचार करण्यास शिक्षित करावे लागेल, अशी सूचनाही मोदी यांनी यावेळी केली आहे. “राज्यं एकमेकांकडून शिकू शकतात, प्रेरणा घेऊ शकतात आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करू शकतात. ही राज्यघटनेची भावना असून आपलं नागरिकांप्रति कर्तव्य आहे”, असे मोदी म्हणाले आहेत.

“कायदा आणि सुव्यवस्था एखाद्या राज्यापुरती मर्यादित नाही, कारण गुन्हेगारी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही वाढत आहे. यामुळे राज्य आणि केंद्रातील यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे. जोपर्यंत या मुद्द्यांवर पोलीस आणि केंद्रीय संस्थांकडून समान प्रतिसाद मिळत नाही आणि याविरोधात लढण्यासाठी ते एकत्र येणार नाहीत, तोपर्यंत या समस्येला तोंड देणे अशक्य आहे”, असे त्यांनी नमुद केले आहे.

ऑनलाईन चिंतन शिबिरात आज आठ राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसोबतच १६ राज्यांचे उपमुख्यमंत्री सहभागी झाले होते. दोन दिवसीय हे शिबिर गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत सुरू आहे. या शिबिरात पोलीस दलाचे आधुनिकीकरण, सायबर गुन्ह्यांचे व्यवस्थापन, न्याय व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर, भू-सीमा व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, महिला सुरक्षा, अंमली पदार्थांची तस्करी आदी विषयांवर मंथन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish