INDIA NEWS

Press

पहाटेच्या शपथविधीचं भूत! अजित पवार-जयंत पाटलांमधला ‘संघर्ष’ पुन्हा समोर?

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत आहे. या दोघांकडून हा शपथविधी का करण्यात आला, याबाबतचं गुपित उलगडण्यात आलं नाही.

RaviRaj 29 Jan 2023

जयंत पाटील

मुंबई, 29 जानेवारी : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत आहे. या दोघांकडून हा शपथविधी का करण्यात आला, याबाबतचं गुपित उलगडण्यात आलं नाही, पण काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. जयंत पाटील यांनी तर या शपथविधी विषयी बोलताना थेट शरद पवारांचंच नाव घेतलं.

पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते. तेव्हा राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, त्यामुळे ही राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पवारांनी ही खेळी केली असू शकते, असा संशय जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता. जयंत पाटील यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाला, त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा स्पष्टीकरण द्यावं लागलं. हा माझा कयास असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते.

जयंत पाटलांच्या या विधानानंतर अजित पवार यांना पुन्हा एकदा या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आला. या चर्चा महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे. पहाटेच्या या शपथविधीचं विधान जयंत पाटील यांनी केलं आणि त्यानंतर या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा रोख जयंत पाटील यांच्याकडे तर नाही ना? अशा चर्चा दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत.

अजितदादा-जयंत पाटलांमध्ये संघर्ष?

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये संघर्ष असल्याच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं होतं, तेव्हा अजित पवारांनी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली होती. तसंच जयंत पाटलांच्या निलंबनावेळी अजित पवार फार आक्रमक नसल्याचंही बोललं गेलं.

त्याआधी जयंत पाटलांनी अजित पवार आपल्याला ज्युनिअर असल्याचं सूचक विधानही केलं होतं. तसंच विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद अजित पवारांना देण्यात आल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याची वृत्तही आली होती, पण जयंत पाटील यांनी या बातम्या फेटाळून लावल्या.

डिसेंबर महिन्यात शरद पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही अजित पवारांच्या विधानानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. ‘आपण असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे असं म्हणतो. प्रत्येक नेत्याने आपल्या जिल्ह्यातून जास्त आमदार निवडून आणण्याचे प्रयत्न करा. आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर जाऊ. याच्यामध्ये अपवाद फक्त, नाशिक, पुणे आणि बीड जिल्हा आहे,’ असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांचा रोख त्यावेळी जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यावर होता का? असे प्रश्न्ही विचारले गेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish