INDIA NEWS

Press

“पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला…” अमोल मिटकरींचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे.

August 16, 2022 6:34:31 pm

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मागील काही दिवसांपासून विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी प्रलंबित आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने १२ आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. पण कोश्यारी यांनी संबंधित यादीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं अनेकदा राज्यपालांची भेट घेऊन, संबंधित यादी मंजूर करण्याची मागणी केली होती. पण राज्यपाल महोदयांनी महाविकास आघाडी सरकारकडून दिलेली यादी मंजूर केली नाही.

याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, राज्यपालांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या बाजुने घेतलेल्या भूमिका पाहता, ते अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपाकडून दिलेल्या १२ विधान परिषद आमदारांची यादी मंजूर करतील, यात शंका नाही. शेवटी त्यांनी पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला महत्त्व द्यायचं नाही, असं ठरवलं असावं… असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

उद्यापासून महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी हे ट्वीट केलं आहे. १७ ऑगस्ट ते २५ ऑगस्टदरम्यान हे पावसाळी अधिवेशन पार पडणार असून शिंदे-फडणवीस सरकारची ही पहिली परीक्षा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish