प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक तात्काळ घ्या-उमेदवार व शेकडो मतदारांचा उद्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे कळकळीचा आक्रोश..
Parmeshwar hatole 14 December 2025

लोकशाहीचा आवाज दाबू नका !
अकोट : अकोट नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक तात्काळ घेण्यात यावी, या मागणीसाठी प्रभागातील सर्व उमेदवार व शेकडो मतदार उद्या जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी, अकोला यांच्याकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून अत्यंत भावनिक, कळकळीचे व ठाम निवेदन सादर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्यामुळे दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सदर प्रभागाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. ही बाब मान्य असली, तरी आता संपूर्ण महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकांचा दुसरा टप्पा दि. २० डिसेंबर २०२५ रोजी होत असताना आणि दि. २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असताना केवळ प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक प्रलंबित ठेवणे म्हणजे या प्रभागातील जनतेवर अन्याय असल्याची तीव्र भावना व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांपासून अकोट नगरपरिषद प्रशासक राजवटीखाली असून या काळात प्रभाग क्रमांक ४ चा विकास अक्षरशः ठप्प झाल्याचा संतापजनक आरोप उमेदवार व नागरिकांनी केला आहे. रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची टंचाई, स्वच्छतेचा बोजवारा, आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था यामुळे नागरिक त्रस्त असून लोकशाहीतून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्याने जनतेचा आवाज दडपला जात असल्याची तीव्र खंत व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांनी दिवस-रात्र अथक परिश्रम घेतले असून जनतेसमोर केवळ आश्वासनांची नव्हे तर कृतीची भूमिका मांडली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा मांडण्यात आला असून, त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील तमाम मतदारांची एकमुखी मागणी आहे की ही निवडणूक आणखी लांबवू नये. शिवाय, मा. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक तात्काळ घेणे हे घटनात्मक, कायदेशीर व नैतिकदृष्ट्या आवश्यक असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
“लोकशाहीचा गळा दाबू नका, आमच्या हक्काचा प्रतिनिधी आम्हाला द्या,” अशी भावनिक हाक देत उद्या सर्व उमेदवार व मतदार दि. २० डिसेंबर २०२५ रोजीच प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक घेण्याचा निर्णय घ्यावा, अशी कळकळीची व ठाम मागणी प्रशासनाकडे करणार आहेत. शेकडो मतदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या निवेदनाकडे संपूर्ण प्रभागाचे लक्ष लागले असून जिल्हा प्रशासन कोणता न्यायप्रिय निर्णय घेते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.







