Nagpur : पंधरा वर्षांत पक्ष का वाढला नाही? : मनसे नेत्यांचा सवाल…
Raviraj
14 spt 2022
नागपूर : सुमारे दीड दशकांपूर्वी स्थापना झाल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूरसारख्या मोठ्या शहरात का फोफावली नाही, वाढ होण्याऐवजी पक्षाचा ऱ्हास का झाला अशी प्रश्नांची सरबत्ती करून मनसे नेत्यांमार्फत झाडाझडती घेण्यात येत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली आहे.मनसेचे प्रमुख राज ठाकरे १८ तारखेला नागपुरात येत आहेत. तत्पूर्वी विदर्भात पक्षाची पुनर्बांधणी, महापालिकेच्या निवडणुकीचा आढावा मनसेतर्फे घेतला जात आहे. याकरिता मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि विदर्भातील आनंद एंबडवार यांना नागपूरला पाठवण्यात आले आहेत. या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रविभवन येथे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ, पश्चिम तसेच दक्षिण-पश्चिम नागपूरमधील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. उद्या गुरुवारी उर्वरित तीन आणि ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. आजवर केलेल्या कामांची झाडाझडती घेतल्या जात असल्याने मनसेचे पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. त्यामुळे या दौऱ्यात काही पदाधिकाऱ्यांची गच्छंती निश्चित मानल्या जात आहे.
आम्ही स्वबळावरच लढणारः देशपांडेतत्पूर्वी पत्रकारांसोबत बोलताना संदीप देशपांडे यांनी मनसेतर्फे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणुका लढणार असल्याचे सांगितले. मनसे-शिंदेसेना-भाजप युतीच्या केवळ चर्चा आहे. सध्या आम्ही स्वबळाच्या तयारीसाठी आलो आहोत. युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हे घेतील. विदर्भाकडे आजवर मनसेच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राज ठाकरे अनेकदा विदर्भात येऊन गेले. पक्षाला फारसे यश मिळाले नाही याची कारणे वेगळी असू शकतात. मात्र, यापुढे आम्ही दमदारपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संदीप देशापांडे यांनी सांगितले.