पुराच्या पाण्यात युवक दुचाकीसह वाहून गेला, सुदैवाने बचावला
अकोला : जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून, नदी-नाल्या पुराने ओसंडून वाहत आहेत. मुर्तीजापूर तालुक्यातील कमळगंगा नदीला आलेल्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना दुचाकी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. पुराच्या लोंढ्यात दुचाकीस्वार युवक वाहून गेला. पोहता येत असल्यामुळे युवक सुदैवाने बचावल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
मुर्तीजापुर तालुक्यातील ब्रम्ही गावाजवळील कमळगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना गुंजवाडा येथील एक तरुणाने दुचाकीवरुन पाण्यातुन जायचे धाडस केले. तेथे उपस्थित असलेल्यांनी त्याला पुराच्या पाण्याची कल्पना दिली. परंतु, कुणालाही न जुमानता दुचाकीस्वार पुलावरील पाण्यातून दुचाकी काढत पुढे गेला. पुलाच्या मध्यभागी आला असता पाण्याच्या प्रवाहापुढे त्याचा टीकाव लागला नाही. त्यामुळे तो युवक दुचाकीसह पुलावरून नदीपात्रात कोसळला व वाहत गेला.