रायगड: आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बनावट पत्र प्रकरण!-रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
RaviRaj 23 April 2023
अलिबाग – आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचे एक बनावट पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले होते. आता या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागावर या तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शनिवारी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाले. ज्यात राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले गेले होते. शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असल्याचेही नमूद करण्यात आले होते. माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला, साधकांसाठी मंडप टाकला नाही. त्यामुळे यापुढे भाजपा आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे आवाहनही करण्यात आले होते.
समाजमाध्यमांवर हे पत्र वेगाने प्रसारीत होण्यास सुरवात झाल्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे सचिव संदीप पाटील यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही नोंदवली आहे. यानंतर शनिवारी रात्री उशिरा या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादवी कलम ५००, ५०१, ५०५ (२), ५०५ (३) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे ६६ सी आंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर येथील श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी एक सद्भावना पत्र जारी केले होते. परंतु या पत्राच्या मजकुरात बदल करून, अनुयायांमध्ये राज्यशासनाच्या विरोधात शत्रुत्वाची, तसेच द्वेशभावना तयार होईल, सरकारविरोधात उठाव होईल या उद्देशाने खोटे पत्रक तयार करून ते समाजमाध्यमांवर टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान समाजमाध्यमांवर या बनावट पत्रकाचा प्रसार करू नका आणि अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.