एस.टी.च्या फेर्या उशिरा सुटण्यावर मोठी लगाम; आगार व्यवस्थापकांसाठी ‘सोमवारी सकाळची कडक हजेरी’ अनिवार्य!
salim khan 17 October 2025

Akola: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) अखेर उशिरा सुटणाऱ्या फेऱ्यांवर कठोर भूमिका घेतली आहे. महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व विभाग नियंत्रकांना स्पष्ट निर्देश देत सांगितले आहे की, आगारातून सुटणाऱ्या पहिल्या फेरीपासून ते सकाळच्या सर्व फेर्या वेळेत सुटल्या पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक सोमवारी आगार व्यवस्थापक स्वतः पहिल्या फेरीच्या वेळेस उपस्थित राहणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
लांब व मध्यम पल्ल्याच्या फेर्या वेळेत न सुटल्याने उत्पन्नात घट आणि भारमानावर ताण येत असल्याचे अहवालांतून समोर आले. त्यामुळे आता आगार व्यवस्थापकांना थेट जबाबदार धरण्यात येणार असून कोणतीही सबब चालणार नाही, कोणताही प्रतिनिधी पाठविणेही मान्य होणार नाही, असे महामंडळाने कठोरपणे स्पष्ट केले आहे.
बस फलाटाला नेमक्या किती वाजता लागली? बसची स्वच्छता कशी आहे? चालक-वहक वेळेत उपस्थित होते का? याची सक्त तपासणी सोमवारी सकाळी व्यवस्थापकांकडूनच होणार आहे. विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी यांनीही अचानक तपासण्या कराव्यात, अशा सूचना पत्रात देण्यात आल्या आहेत.
तपासणीदरम्यान आढळलेली प्रत्येक बाब नोंदवहीत नोंदवून ठेवण्यास सांगण्यात आले असून महाव्यवस्थापक (वाहतूक) स्वतः वेळोवेळी याचा आढावा घेणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणार असल्याचे आदेशात ठळकपणे नमूद आहे.
राज्यातील सर्व विभागांमध्ये — संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, नांदेड, पालघर, रायगड, रत्नागिरी, नागपूर ते अकोला, बुलढाणा — सर्वत्र सोमवारी सकाळची ही ‘कडक पहारेदारी’ आता अनिवार्य होणार आहे.
एमएसआरटीसीच्या कागदोपत्री आदेशाला आता वास्तवात काटेकोर अंमलबजावणी मिळते का, याकडे कर्मचाऱ्यांसह प्रवाशांचेही लक्ष आहे.







