संजय आठवले विरुद्ध धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-तहसीलदारांना मागितली होती लाखो रुपयांची खंडणी..
RaviRaj 13 March 2024
धारणी : तहसिलदारांना लाखो रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय हिरामण आठवले (रा. बिच्छूटेकडी, अमरावती) यांच्यासह सहा जणांच्या टोळीला धारणी पोलिसांनी अटक केली. त्यात शिक्षक पत्रकार संजय लायदे, बबलु यादव, पत्रकार पंकज लायदे, धर्मपाल चतूर आणि सेवानिवृत्त मंडळ अधिकारी मधुकर सावळे यांचा समावेश आहे.
धारणी येथील तहसिलदार प्रदिप शेवाळे यांनी धारणी तहसीलदारपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून संजय आठवलेसह अन्य साथीदार शेवाळे यांना सतत पैशाची मागणी करीत होते तसेच कोणतेही काम त्यांना सांगून दबाव टाकत होते आणि माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल करून शेवाळे यांना मानसिक त्रास देत होते. मोबाईवर फोन करून शिवीगाळ करून पैशाची मागणी करीत होते. जीवाने मारण्याची धमकी देत होते. काही दिवसापूर्वी संजय आठवले यांनी तहसीलदार शेवाळे यांच्या मोबाईलवर हमारे बॉस संजय लायदे इन्हे १ लाख रुपये और हमारे लिए प्रतिव्यक्ती ५० हजार रुपये भेज दें, नहीं तो तुझे जानसे मार डालेंगे, असा मॅसेज केला. त्यावरून तहसीलदारांनी धारणी ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर शेवाळे यांनी ५० हजार रुपये देण्याचे कबुल केले. सोमवारी (ता.११) संजय आठवले यांनी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांना अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळ कार्यालयाजवळ पैसे घेऊन बोलाविले.
ठरल्याप्रमाणे ते पैसे घेऊन गेले आणि आठवलेला दिले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर अन्य साथीदारांना अटक केली. मंगळवारी (ता. १२) सर्वांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कारागृहात रवानगी केली..