INDIA NEWS

Press

Sanjay Raut : आजपासून संजय राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात; 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

संजय राऊतांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी. पत्राचाळ प्रकरणात कारवाई, आजपासून राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात.

संजय राऊत

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी ईडी (ED) कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Scam Case) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशीरा ईडीनं अटक केली होती. तेव्हापासून राऊत ईडी कोठडीत होते. न्यायालयानं राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडी कोठडी आज संपत असल्यानं संजय राऊतांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. राऊतांप्रमाणेच त्यांच्या पत्नी वर्षा राऊतही ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. दरम्यान संजय राऊतांच्या वकिलांकडून आज पुन्हा जामिनाची मागणी करण्यात आली. संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराची चौकशी करायची असल्यानं गेल्यावेळी ईडीनं राऊतांची कोठडी वाढवून मागितली होती.

पत्राचाळ प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांची रवानगी आता आर्थर रोड कारागृहात होणार आहे. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं आहे. पत्राचाळ कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना 31 जुलैंच्या मध्यरात्री अटक झाली. त्यानंतर गेले 8 दिवस ईडीच्या कोठडीत त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीनं समन्स बजावले त्यांचीही चौकशी करण्यात आली. 

संजय राऊतांवर नेमके आरोप काय?

ईडीनं संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी थेट हात असल्याचा आरोप केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे नावालाच होते. या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीनं केला आहे. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते, असा आरोप ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish