INDIA NEWS

Press

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार, शिंदे गटाची मोठी खेळी; अंधारे बॅकफूटवर जाणार?

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे.

Ravi Raj 13 Nov 2022

सुषमा अंधारे व त्यांचे पती वैजनाथ वाघमारे

ठाणे: ठाकरे गटाची मुलुख मैदानी तोफ म्हणून अल्पावधीतच लोकप्रियता मिळवलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. अंधारे यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुषमा अंधारे या बॅकफूटवर जाव्यात म्हणून शिंदे गटाने ही मोठी खेळी केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अंधारे बॅकफूटवर जातात की अधिक आक्रमक होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांचा आज शिंदे गटात प्रवेश होणार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात वैजनाथ वाघमारे यांचा प्रवेश होणार आहे. याच कार्यक्रमात अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही प्रवेश होणार आहे. मात्र, वाघमारे यांना प्रवेश देऊन शिंदे गटाने सुषमा अंधारे यांची डोकेदुखी वाढवल्याचं सांगितलं जात आहे.

सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्याने अंधारे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांनीही त्यांना शिवसेनेचं उपनेतेपद दिलं. सुषमा अंधारे यांनी या संधीचं सोनं करत अल्पावधीतच पक्षात आणि राज्यात आपली छाप उमटवली. एवढेच नव्हे तर आपल्या अचूक आणि अभ्यासपूर्ण विधानांनी विरोधकांना सळो की पळो करून सोडलं.

विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांच्या रडारवर शिंदे गट आहे. त्या शिंदे गटावर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाहीत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन थेट हल्लाबोल केला.

त्यामुळे शिंदे गटाची पळताभूई थोडी झाली आहे. त्यामुळेच शिंदे गटाने सुषमा अंधारे यांना टेन्शन देण्यासाठी वैजनाथ वाघमारे यांना आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न करून मोठी खेळी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish