INDIA NEWS

Press

थंडीच्या लाटेमुळे शाळेच्या वेळेत तात्काळ बदल करावा: वंचित चे निलेश देव यांची जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडे मागणी..

Ravi Raj 5 Jan 2023

निमा अरोरा आणि निलेश देव

अकोला- गेल्या दोन दिवसांपासून शहरातील वातावरणात बदल झालेला असून ढगाळ वातावरण व गारठा वाढलेला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. हि बाब लक्षात घेता सोमवारपासून काही दिवस सकाळच्या वेळी भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ सकाळी नऊ वाजताची करण्यात यावी, अशी मागणी अॅड धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
बुधवारपासून अकोल्याच्या वातावरणात अचानक बदल झालेला असून सूर्यदर्शन झालेले नाही. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा वाढलेला आहे. सध्या पंधरा-सोळा डिग्रीपर्यंत तापमान खाली गेलेले आहे. अशा कमी तापमानात शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना सकाळी सात साडेसात वाजता घरून निघावे लागते. बाहेरगावहून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना तर सकाळी सहा किंवा साडेसहा वाजता निघावे लागते. ही बाब चिमुकल्या लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगली नाही.
याशिवाय सोमवारपासून तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तसे झाल्यास सकाळी नऊच्या आधी भरणाऱ्या शाळांमधील लहान विद्यार्थ्यांना आरोग्याच्या मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या जीविताला धोकाही निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता सकाळच्या वेळी भरणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ सोमवारपासून काही दिवसांसाठी म्हणजे तापमान सामान्य होईपर्यंत नऊ वाजताच्या नंतरची करण्यात यावी, अशी मागणी निलेश देव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी पालकांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish