INDIA NEWS

Press

“ट्रिपल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा स्फोट — बालकांच्या हक्कांवर गदा, अधिकारी-मंत्र्यांची मिलीभगत उघड!”

salim Khan 10 September 2025

महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार अक्षरशः बोकाळला आहे. चिमुकल्यांच्या भविष्याशी खेळत स्वतःची आर्थिक पोळी भाजणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जनतेची, शासनाची व न्यायाची अजिबात भीती राहिलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना न जुमानता महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून बालकांच्या तोंडातील घास खेचत खुलेआम करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप उघडकीस आला आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी बसवण्यात आलेल्या टाक्यांमधील घोटाळ्याविरोधात पातुर येथील राजरत्न कांबळे आणि विजयकुमार ताले या कार्यकर्त्यांना १५ ऑगस्टपासून तब्बल नऊ दिवस आमरण उपोषण करावे लागले. जनतेच्या दबावानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली — पण आज दोन महिने उलटून गेले तरी चौकशी अहवालाचा पत्ता नाही!

समितीतील सदस्य माया शिर्के, राजेश खुमकर आणि गजानन उघडे यांनी आजवर कोणताही ठोस अहवाल सादर केला नाही, उलट उपोषणकर्त्यांकडूनच पुरावे मागून चौकशीची थट्टा केल्यासारखी भूमिका घेतली. एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश असूनही दोन महिने उलटून गेले आणि तरीही कारवाई नाही, हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेचे आणि भ्रष्टाचाराला मिळालेल्या संरक्षणाचे ठळक उदाहरण ठरले आहे.

काल झालेल्या सुनावणीत समितीचे सदस्य राजेश खुमकर गैरहजर होते — म्हणजेच चौकशीवरच प्रश्नचिन्ह! समितीला वाढीव मुदत नसताना सुद्धा तिचा मनमानी कारभार सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांना दिलेले आश्वासन खोटे ठरले आणि चौकशी फक्त वेळ मारून नेण्याचे माध्यम ठरले आहे.

या भ्रष्टाचाराचे बळी मात्र निरपराध साडेपाचशे अंगणवाडी सेविका ठरणार का? कारण, अनेक पुराव्यांनुसार या सर्व भ्रष्टाचारासाठी सेविकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच प्रवृत्त केले होते. त्यामुळेच आता ही समिती करोडो रुपयांची मलाई खाल्लेल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सेविकांना बळीचा बकरा बनवणार का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

अकोला जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातच हा गैरप्रकार पसरलेला असल्याचा दावा अनेक अधिकाऱ्यांनी केला आहे. “आमचं काहीच कुणी करू शकत नाही, आम्ही मंत्र्यांच्या आशीर्वादाने काम करतो,” अशा बेधडक भावना अधिकाऱ्यांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहेत.

चिमुकल्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या या सरकारला जनता कधीच माफ करणार नाही! भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे, चौकशी थांबवणारे आणि सत्य दडपणारे हे कारभार आता जनतेच्या रोषाला सामोरे जातील, अशी संतप्त प्रतिक्रिया जिल्हाभरातील पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish