INDIA NEWS

Press

अखेर कुख्यात क्लब माफिया मनिष कराळे, वरली किंग राजेश साळुंके सह प्रसन्न जवंजाळ वर विनयभंगाचे गंभीर गुन्हे दाखल..

salim Khan 22 Octomber 2025

कुख्यात क्लब माफिया आरोपी अकोला शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख मनिष रामाभाऊ कराळे
Amravati : अकोट परिसरातील कुख्यात क्लब माफिया मनिष उर्फ अभिजीत रामाभाऊ कराळे, ‘वरली किंग’ राजेश साळुंके आणि त्यांचा साथीदार प्रसन्न जवंजाळ या त्रिकुटावर विनयभंग, जातिवाचक शिवीगाळ आणि धमकीचे गंभीर गुन्हे दाखल झाले असतानाही, अमरावती पोलिसांकडून या आरोपींवर ठोस कारवाई न झाल्याने संशयाचे ढग दाटले आहेत. कायद्याचे पालन करणारे पोलिसच राजकीय दबावाखाली आरोपींचे रक्षण करत आहेत का, असा गंभीर प्रश्न आता जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दर्यापूर तालुक्यातील वरुड कुलट येथील गोरगरीब शेतमजूर गजानन शिरसाट यांनी 13 ऑक्टोबर रोजी अकोटच्या हिवरखेड रोड वरील काट्यावर सुरू असलेल्या अवैध वरली व्यवसाय ठिकाणी वरली लावण्यासाठी गेले असता, त्यांचे दोन हजार रुपये हरवले. हरवलेली रक्कम मागितल्यावर आरोपींच्या माणसांनी धमकी देत, “पोलिसांकडे गेला तर व्यवसाय बंद पडेल,” असा इशारा दिला. अखेर दबावाखाली त्यांनी शिरसाट यांना दोन हजार रुपये परत केले, पण गप्प राहण्याची सक्त ताकीद दिली.

मात्र 20 ऑक्टोबरच्या रात्री या तिघा गुंडांनी अचानक गावात घुसून गावाच्या बाहेर नेऊन शिरसाट आणि त्यांच्या पत्नीवर जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. “धेडगे हो, महारे हो, तुमची औकात नाही तर पैसे घेतले कशाला ? आताच दोन हजार परत करा, नाहीतर गावात राहू देणार नाही!” आमचे कुणीच काही करू शकत नाही “अकोला च नाहीतर अमरावती पोलीस सुद्धा आमच्या खिशात आहे” अशी उघड धमकी देण्यात आली
या गंभीर घटनेची तक्रार येवदा पोलिस ठाण्यात नोंद झाली असून भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 74, 352, 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात पोलिस प्रशासन हलगर्जी दाखवत आहे. जातिवाचक शिवीगाळ झाल्याचे एफआयआरमध्ये स्पष्ट नमूद असूनही दर्यापूर उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी आरोपींविरोधात तत्काळ अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला नाही, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दरम्यान, मुख्य आरोपी मनिष कराळे हा अकोला जिल्ह्यातील शिंदे सेनेचा उपजिल्हाप्रमुख असल्याने, या प्रकरणात राजकीय दबाव टाकून पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. या आरोपींनी काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोटे पुरावे तयार करण्याचे षडयंत्र रचले असल्याची चर्चा जोरात आहे. यामुळे संपूर्ण चौकशीची पारदर्शकता धोक्यात आली असून, पीडित कुटुंबावर प्रचंड अन्याय होत आहे. सध्या शिरसाट कुटुंब भीतीच्या छायेत जगत आहे. आरोपींचे सहकारी व वरली बहाद्दरांचे टोळके त्यांच्या घराजवळ फिरत असल्याने तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात आहे. “तक्रार मागे घे नाहीतर परिणाम भोगावे लागतील,” अशा प्रकारे धमक्या दिल्या जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.

राजकीय छत्राखाली वाढलेले हे वरली माफिया आता थेट पोलिसांनाच पायपुसने समजून कायद्याचा खेळ मांडत आहेत. अमरावती पोलिसांचा संशयास्पद मौन आणि आरोपींना मिळणारे संरक्षण पाहता, “राजकीय दबावापुढे पोलिस यंत्रणा हतबल झाली आहे का?” हा प्रश्न आता सर्वांच्या मनात खोलवर घुसला आहे.
दरम्यान, विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, “जर शिरसाट कुटुंबावर अन्याय झाला, तर अमरावती पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला आहे.
अमरावती पोलिस आरोपींच्या दबावाला बळी पडतात की न्यायव्यवस्था अबाधित ठेवत गोरगरीब शिरसाट कुटुंबाला न्याय देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish