“लाचेच्या जाळ्याचा स्फोट: जया इंगोले प्रकरणातून ‘टक्केवारी’चा मोठा भांडाफोड होणार?”
Abhijit solanke 2 May 2026

अकोला : पंचायत समिती अकोला येथील बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्रीमती जया पांडुरंग इंगोले यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाचा पीसीआर मिळाला आहे. आज पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर पीसीआर वाढवला जाणार की त्यांना थेट न्यायालयीन कोठडीत (जेल) पाठवले जाणार, याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्यातील कर्मचारी व अधिकारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणाने केवळ एका कनिष्ठ अभियंत्यापुरतेच मर्यादित न राहता, संपूर्ण ‘टक्केवारी’च्या साखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. जया इंगोले यांनी लाच स्वीकारताना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली किंवा सूचनेवर काम केले का? या लाचेच्या रकमेमध्ये आणखी कोणाकोणाचा हिस्सा होता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आता तपास यंत्रणेसाठी अत्यावश्यक ठरत आहे. या प्रकरणातून आणखी किती वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे समोर येणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महिला बालकल्याण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाच्या चौकशी अहवालाला गोपनीय ठेवण्यामागे नेमके कोणते आर्थिक हितसंबंध दडले आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संबंधित कंत्राटदारांशी काही आर्थिक संबंध आहेत का? तसेच महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महिला बालकल्याण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे संकेत मिळत असून काही अधिकाऱ्यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे जया इंगोले प्रकरण हे केवळ एक ‘लाच प्रकरण’ न राहता, मोठ्या भ्रष्टाचाराच्या साखळीचा धागा उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आता केवळ जया इंगोलेच नाहीत, तर महिला बालकल्याण विभागातील काही अधिकारी आणि वरिष्ठ पातळीवरील व्यक्ती देखील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात पुढे आणखी कोणाचे चेहरे उघड होणार आणि ‘टक्केवारीच्या खेळा’मागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा अंतिम खुलासा येणारा काळच करणार आहे.







