INDIA NEWS

Press

“उत्तमसरा पेटले! अमरावती जिल्ह्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार..प्रशासनाविरोधात तरुणाचा आमरण रणसंग्राम..ग्रामपंचायतीवर गंभीर आरोपांची स्फोटक मालिका”

Abhijit solanke 23 April 2026

अमरावती : जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गाव सध्या प्रचंड संतापाच्या ज्वाळांनी धगधगत असून ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट कारभाराविरोधात एका नवयुवकाने उभा केलेला लढा आता संपूर्ण विदर्भासाठी प्रेरणादायी ठरत आहे. 21 एप्रिलपासून अभिषेक सवाई हा तरुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसला असून दोन दिवसांपासून अन्नत्याग करून तो अन्यायाविरोधात झुंज देत आहे. त्याच्या आरोपांनी संपूर्ण प्रशासन यंत्रणेची झोप उडवली असून गावात संतापाची लाट उसळली आहे.

अभिषेक सवाई यांनी थेट ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव यांच्यावर पंधराव्या वित्त आयोगातील कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढ्यावरच न थांबता जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मैदानाच्या कामातही लाखो-कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे त्यांनी उघड केले आहे.

गुरुदेव नगर, उत्तमसरा येथील नवीन लेआउट संदर्भातील व्यवहार, तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातील कथित गैरव्यवहाराने हा प्रकार आणखी धक्कादायक बनला आहे.
या सर्व आरोपांमुळे गावातील नागरिक संतप्त झाले असून अभिषेकच्या आंदोलनाला अभूतपूर्व असे लोकसमर्थन मिळत आहे. महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून या लढ्याला बळ दिले आहे.

गावातील सर्वसामान्य जनता आता उघडपणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत असून “हिशेब द्या, नाहीतर गादी सोडा” अशी ठाम भूमिका घेतली जात आहे.विशेष म्हणजे, अभिषेक सवाई याच्या धाडसी भूमिकेमुळे परिसरातील तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा घेऊन अनेक नवयुवक या आंदोलनात सहभागी होत आहेत.

हा लढा केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याची ठिणगी आता अमरावती जिल्ह्याच्या पलीकडे संपूर्ण विदर्भात पसरू लागली आहे.दरम्यान, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा अधिकृत प्रतिक्रिया न आल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्तेही मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याने येत्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

उत्तमसरा येथील हा लढा आता भ्रष्टाचाराविरोधातील जनआक्रोशाचे प्रतीक बनत असून “एकटा लढतोय, पण हजारो उभे आहेत” असा संदेश देत आहे. प्रशासनाने वेळीच जागे होऊन या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी केली नाही, तर हा ज्वालामुखी कधीही फुटू शकतो,आणि त्याची जबाबदारी पूर्णपणे संबंधित यंत्रणांवरच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish