अकोटमध्ये “प्रहार” ठप्प! पोलीसच झाले माफियांचे भागीदार?..अर्चित चांडक यांचा आदेश धाब्यावर, स्थानिक पोलीस वरली सिंडिकेटच्या पायाशी!
Salim Khan 31 October 2025

अकोला जिल्ह्यात पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेली “प्रहार मोहीम” जोरात सुरू असतानाच अकोट शहरात मात्र या मोहिमेचा एक टक्काही परिणाम दिसत नाही. खरोखरच चांडक यांना अवैध धंदे बंद करायचे आहेत का, की अकोटचे पोलीस त्यांच्याच आदेशाला उघडपणे हरताळ फासत आहेत, हा सवाल आता शहरभर चर्चेत आहे. अकोट शहरात आजही शिंदे सेनेचा उपजिल्हाप्रमुख क्लब माफिया मनिष कराळे, वरली किंग राजेश साळुंके आणि हप्तेखोरी सिंडिकेट यांचे जाळे उघड्यावर फोफावत आहे. पोलीस विभागाचे काहीच बरेच कर्मचारी या माफियांच्या हप्तेखोरीच्या थेट यंत्रणेत सामील असल्याची चर्चा अधिकृत स्तरावर सुरू झाली आहे.
वरली माफियांचा बचाव आणि पोलिसांचा मौन, या संगनमताने अकोट पोलीस ठाण्याच्या प्रतिष्ठेचा चुराडा केला आहे.
पोस्ट ऑफिससमोरील क्लब, आठवडी बाजार, धारुडी वेस, श्रीनिवास टॉकीज परिसर, हिवरखेड रोडवरील दालमिलचा काटा हा राजेश साळुंकेच्या वरली व्यवसायाचे केंद्रबिंदू आहे, उमरा, मुंडगाव, बसस्टँड, नेहरू पार्क, गोल बाजार, गांधी मैदान या सर्व ठिकाणी पोलिसांच्या डोळ्यादेखत लाखो रुपयांची वरलीची उलाढाल सुरू आहे.
यातल्या काही ठिकाणी तर कायदेशीर परवानगीच्या नावाखाली पोलिसांनीच संरक्षण दिल्याचे आरोप नागरिक करत आहेत. रिलायन्स पेट्रोल पंप, लकडगंज परिसरात तर “व्हाईट कॉलर माफिया” खुलेआम धंदे चालवत आहेत, हे उघड गुपित आहे. अकोलखेड ऑटोस्टँड, अकोली जहागीर, पोपटखेड, पणज, सावरा यांसारख्या ग्रामीण भागातही वरली धंदे सुरू आहेत. पोलिसांनी एकदाही छापा न टाकणे, कोणत्याही ठिकाणी कारवाई न होणे, आणि काही ठिकाणी माफियांना आधीच खबर मिळणे हे नेमके कोणाच्या संमतीने घडतेय?

शहरातील प्रत्येक नागरिकाला माहित असलेल्या ठिकाणांचे ठसे पोलिसांच्या नकाशावर का नाहीत?
ही मूक संमती वरिष्ठांची आहे का? की पोलिस यंत्रणेला हप्तेखोरीने गिळले आहे?
अर्चित चांडक यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असूनही जिल्हा मुख्यालयाकडून अकोट पोलीस प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही, ही गोष्ट अधिकच संशयास्पद आहे. “प्रहार मोहीम” ही खरोखर गुन्हेगारीवर आहे का की फक्त कागदोपत्री दिखावा?”असा गंभीर संशय उपस्थित केला जात आहे
अवघे शहर माफियांच्या पायाशी झुकलेले असताना, अर्चित चांडक अजून किती काळ शांत राहणार?







