INDIA NEWS

Press

अकोटातील कुख्यात आरोपी बिल्डरला बुलढाणा पोलिसांकडून अटक होणार..मुन्ना अग्रवाल ची इन्कम टॅक्स चोरी तपासात निष्पन्न होण्याची शक्यता !

parmeshwar Patil 15 October 2025

Akot/Buldhana : अकोट शहर आणि बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या प्रकरणात बिल्डर तसेच गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुन्ना उर्फ शशिकांत बजरंगलाल अग्रवाल यांच्यावर शेगाव पोलिसांनी नोंदवलेल्या विनयभंग, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि इतर कठोर कलमांनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांनी मोठा भूकंप घडवला आहे. तक्रार दाखल होताच अग्रवाल शहरातून गायब झाले असून, गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा थांगपत्ता लागत नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाणा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडमध्ये असून, अग्रवालचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

दरम्यान, या घटनेचे स्वरूप अगदी साध्या वादापासून दूर जाऊन अवैध धंदे, स्थानिक गुंडगिरी आणि आर्थिक हितसंबंध यांच्या भोवऱ्यात ओढले जात असल्याचे उघडकीला येत आहे. पीडित महिलेनं तक्रारीत केलेल्या आरोपांनुसार, काही संशयास्पद व्यक्तींनी तिला दाबण्याचा प्रयत्न केला होता. या व्यक्तींच्या पाठीशी कोण उभे होते, कोणते हितसंबंध जपले जात होते, आणि या दबावामागे कोणते मोठे हात आहेत, याविषयी जिल्हाभरात संभ्रम आणि कुजबूज सुरू आहे.

अग्रवाल यांच्या बिल्डर व्यवसायाची घसरण, आर्थिक व्यवहारांतील ताण, तसेच त्यांची स्थानिक कथित वरली बहाद्दर, क्लब माफिया व इतर अवैध व्यवसायिकांसोबतची झालेली मैत्री या सर्व मुद्द्यांनी तपासाचे स्वरूप तीव्र झाले आहे. त्यांच्या संपर्कात कोण–कोण होते? कोणत्या दोन नंबरच्या धंद्यांमध्ये पैसे गुंतवले गेले? आणि कोणत्या घटकांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला?—असे प्रश्न पोलिसांनी तपासात घेतले आहेत. त्यामुळे तपासाचा आवाका एका व्यक्तीपुरताच सीमित राहील की अजून नवे नावे बाहेर पडतील, याकडे संपूर्ण तीनही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेगाव पोलिसांनी या प्रकरणात अग्रवालसह आणखी दोन अज्ञात व्यक्तींवर गंभीर गुन्हे नोंदवले असून, तिघांनी मिळून पीडित महिलेला धमकावून तिचा विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य आणि तक्रारीतील मुद्दे पाहता, चौकशीदरम्यान आणखी गुन्हे वाढण्याची अथवा नव्या आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता पोलीस यंत्रणेने नाकारलेली नाही.

मागील पंधरा दिवसापासून कुख्यात आरोपी मुन्ना आग्रवालचे बंद असलेले अकोट मधील कार्यालय

अग्रवाल यांची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा गत काही वर्षांपासूनच वादग्रस्त राहिली आहे. स्थानिक पातळीवर त्यांचे नाव अनेक गैरप्रकारांमध्ये चाचपडत असताना अखेर या प्रकरणाने त्यांच्या भोवतीचा संशय आणखी गडद केला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील बदनामीच्या भीतीने पाठ फिरवली असून या गंभीर प्रकरणांमध्ये स्वतःला दूर ठेवत सावध भूमिका घेतली आहे मुन्ना अग्रवाल पूर्णपणे एकटे पडल्याची चर्चा रंगली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अग्रवाल यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणातील गुन्ह्यांची व्याप्ती, आर्थिक संबंधांचे धागेदोरे आणि संभाव्य माफिया नातेसंबंध अधिक स्पष्ट होऊ शकतात. जिल्हाभरातील विविध अवैध धंद्यांचे जाळे, त्यांच्या मागील आर्थिक पुरस्कर्ते आणि स्थानिक स्तरावर वाढलेल्या गुंडगिरीच्या घटनांशी यांचा संबंध जोडला जातो का, हे देखील तपासाचे महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरणार आहे.

दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी अग्रवालचा शोध वेगाने आणि काटेकोरपणे सुरू ठेवला आहे. शहर, तालुका, जिल्हा आणि सीमावर्ती क्षेत्रांमध्ये तपासकामी मोहिमा राबवून, विविध ठिकाणांवर छापे टाकून आणि स्थानिक माहितीदार सक्रिय करून आरोपीचा माग काढला जात आहे.

या प्रकरणाने नागरिकांमध्येही प्रचंड असंतोष पसरला असून, “अशा गुन्ह्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी” अशी लोकभावना बुलढाणा–अकोट परिसरात जोरदारपणे उमटत आहे. अग्रवालला अटक होऊन बुलढाणा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता पोलिसांनीही संकेत स्वरूपात नाकारलेली नाही. या सर्व घडामोडींमुळे अकोट–बुलढाणा जिल्ह्यातील वातावरण तापले असून, तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish