INDIA NEWS

Press

“गायगाव पेट्रोल डेपोवर पेट्रोल माफियाचा उघड उच्छाद? मालगाडीवर पेट्रोल चोर टोळीचे नियंत्रण, रेल्वे व पोलीस प्रशासन मात्र हतबल !

salim Khan 15 October 2025

Akola : गायगाव पेट्रोल डेपो परिसरात सुरू असलेल्या पेट्रोल चोरीने आता भीषण रूप घेतल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. उभ्या मालगाड्यांमधून रात्रीच्या अंधारात पेट्रोल काढण्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. फुटेजमध्ये मालगाडीजवळ पाइप, ड्रम आणि वाहने दिसत असल्याचा नागरिकांचा ठाम आरोप असून या दृश्यांनी दररोज लाखोंचे पेट्रोल चोरी होत असल्याचे निदर्शनास येते

ही टोळी उभ्या ट्रेनजवळ उघडपणे हालचाल करताना, टॉर्च लावताना, पेट्रोल काढताना स्पष्टपणे दिसते आणि हा प्रकार काही दिवसांचा नसून अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. दर दोन दिवसांनी मालगाड्या उभ्या असताना पेट्रोल चोरी केल्याचा आरोप होत असून चोरी करणाऱ्यांनी पेट्रोलजवळच सिगरेट आणि गांजा ओढताना दिसल्याचा धक्कादायक दावा नागरिकांनी केला आहे. जिथे फक्त एका ठिणगीने दहा किलोमीटर परिसरात प्रचंड स्फोट होऊ शकतो, तिथे अशी बेपर्वाई म्हणजे परिसरातील हजारो लोकांच्या जिवाशी खेळ असल्याचे स्पष्ट दिसून येते

या टोळीविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना चाकूने हल्ले करण्याचे प्रकार घडले असून, पूर्वी डेपोच्या एका कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचाही दावा समोर आला आहे. त्यामुळे संपूर्ण डेपो परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक खुलेपणाने बोलण्यासही घाबरतात.

या संपूर्ण चोरीच्या व्यवहारातून लाखोंची हप्तेवारी काही स्थानिक पोलिस व काही रेल्वे कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचते, म्हणूनच व्हिडिओ पुरावे समोर असूनही कारवाई होत नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे.
“फुटेज आमच्याकडे आहे, हालचाली स्पष्ट दिसतात, मग कारवाई कुठे आहे?
प्रशासन शांत का? गुन्हेगारांना संरक्षण कोण देतंय?”

त्यांच्या मते पेट्रोल डेपो, रेल्वे स्टेशन, दोन्ही तेल कंपन्यांचे प्लांट आणि दहा किलोमीटर परिसरात मोठ्या अपघाताची शक्यता वाढत आहे आणि हा गंभीर धोका दुर्लक्षित करून प्रशासन मौन बाळगत आहे.

पोलिस प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त तपास मोहीम राबवावी, सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा या निष्क्रियतेमुळे उद्भवणारी दुर्घटना रोखण्याची जबाबदारी प्रशासनावरच राहील,असा ग्रामस्थांचा आक्रमक इशारा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish