INDIA NEWS

Press

वर्दीच्या आड लाचखोरी, अकोल्यात व्यवस्था कोलमडली ! हप्ता–दादागिरी–अपघात, बसस्टँड बनला मृत्यूचा मार्ग!

salim khan 31 January 2026

अकोला : राज्य शासनाकडून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या कामगिरीचे कौतुक होत असतानाच, त्यांच्या अखत्यारितील अकोला बसस्टँड परिसरात कायदा व सुव्यवस्थेची अक्षरशः चिरफाड सुरू असल्याचे धक्कादायक चित्र उघड झाले आहे. बसस्टँड हा सार्वजनिक वाहतुकीचा कणा असताना, इथेच ‘हप्ता राज’ बिनधास्तपणे फोफावल्याचे गंभीर आरोप समोर आले असून ट्राफिक पोलीस कर्मचारी सोनाली वानखडे यांच्यावर ऑटो रिक्षा चालकांकडून शंभर-पाचशे रुपयांचा नियमित हप्ता स्वीकारल्याचे आरोप जिल्हाभरात खळबळ माजवत आहेत.
बसस्टँडच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर ऑटो चालकांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून एसटी बसच्या ये-जा मार्गावर अडथळे उभे केले आहेत. परिणामी प्रवासी, एसटी वाहक व चालकांना रोजचा मानसिक छळ सहन करावा लागत आहे. शिवीगाळ, धमक्या, दमदाटी हे नित्याचे झाले असून “हप्ता दिला की दिवसभर मोकळे” अशी उघड मुजोरी ऑटो चालक दाखवत आहेत. “आम्ही पोलिसांना पैसे देतो, आमचं कुणी वाकडं करू शकत नाही,” अशा शब्दांत कायद्यालाच थेट आव्हान दिले जात आहे—आणि तेही सार्वजनिक ठिकाणी!

या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण देणारी बाब म्हणजे, हप्ता रकमेबाबत केलेला बालिश खुलासा. चर्चेनुसार, एका ऑटो चालकाला “गॅस सिलेंडर भरण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले” असा हास्यास्पद स्पष्टीकरणाचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभरात रंगली आहे. यावरून संबंधित ट्राफिक कर्मचारी किती “दानशूर” आहेत, याची विडंबनात्मक खिल्ली उडवली जात आहे. इतकेच नव्हे तर लाच रक्कम नगदीऐवजी दुसऱ्या ऑटो चालकाच्या फोनपेवर ट्रान्सफर केल्याचे गंभीर आरोपही पुढे आले आहेत. म्हणजे रोख-डिजिटल—दोन्ही मार्ग खुले! यासंदर्भात अनेक पुरावे, व्हॉइस चर्चा आणि ऑटो चालक खाजगीत बोलताना दिसत असल्याची माहिती समोर येत आहे.
या ‘हप्ता राज’मुळे बसस्टँड परिसरात अपघातांची संख्या वाढली असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक सुरक्षेचे केंद्र असलेल्या बसस्टँडवरच शिस्त नसेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडे करायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे—एवढे आरोप, पुरावे आणि चर्चा समोर येऊनही संबंधित महिला ट्राफिक कर्मचाऱ्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट ऑटो चालकांचा आवाज दाबणे, पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. हे चित्र पाहता कायदा व सुव्यवस्था फक्त गोरगरिबांसाठीच आहे का? असा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची प्रतिमा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखली जात असताना, त्यांच्या शहरातील हे गंभीर प्रकार त्यांच्या माहितीत असूनही दुर्लक्षित केले जात आहेत का? राज्य शासनापासून ही वस्तुस्थिती लपवली जात नाही ना? लाचखोर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलीस अधीक्षक सपशेल अपयशी ठरत आहेत का?—हा थेट सवाल आता अकोल्याच्या रस्त्यावरून उमटतो आहे.
दोषींवर कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे ‘अंतर्गत चौकशी’च्या पडद्याआड प्रकरण दडपले जाणार?
पोलीस अधीक्षक जाहीर भूमिका मांडणार का, की दोषींना वाचवण्याचा पुन्हा प्रयत्न होणार? अकोल्याची नजर आता या उत्तरांकडे लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish