INDIA NEWS

Press

“रणधीर भाऊ, वर्षाताई “आम्ही बांगलादेशी की पाकिस्तानी..आदिवासी विद्यार्थ्यांचा टाहो..

Abhijit solanke 17 February 2026

आकाश दादा, अनुप दादा व प्रकाश आबांचा मंचावर जल्लोष, मात्र आदिवासी आधार पासून वंचित तर मुलांचे भविष्य अंधारात

अकोट तालुक्यातील नरनाळा किल्ल्यावर कोट्यवधी रुपयांचा महोत्सव झगमगाटात रंगतोय. लाईट-साऊंड, सेलिब्रिटी, व्हीआयपींची गर्दी, विकासाच्या घोषणा… पण सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या राहणापूर जिल्हा परिषद शाळेतील तेरा विद्यार्थी आजही आधार कार्डविना आहेत. हा केवळ प्रशासकीय विलंब नाही; ही व्यवस्थेची उघडी पडलेली संवेदनाशून्यता आहे.

भारसाकळे आबा हे ८० वर्षाचे झाल्यामुळे त्यांना आधार चे महत्व व भविष्य कळणार नाही मात्र रणधीर भाऊ, तुम्ही सुद्धा स्वतःला जिल्ह्याचे सर्वेसर्वा समजता परंतु पक्षाचे प्रतोद व कॅबिनेट दर्जा असून सुद्धा आदिवासींच्या भावना समजून घेण्यात आपण अयशस्वी ठरले आहात आकाश दादा आपण पालकमंत्री म्हणून मंचावर आदिवासी विकासाची ग्वाही देता, मग या तेरा मुलांच्या जन्मनोंदी पाच वर्षे प्रलंबित कशा?

तुम्ही पालकमंत्री म्हणून किती वेळा राहणापूरला जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला? अनुप दादा, आपली तर प्रतिमाच न्यारी, रेल्वे थांबा व विमानतळाच्या विकासाच्या बैठका होतात; मग आधार साठी विशेष शिबिर का भरवले गेले नाही? वर्षाताई, महिला व बालकल्याणाच्या योजना सांगितल्या जातात; मग जन्मनोंदणीची साखळी का कोसळली?

जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या या कोपऱ्यात आदिवासी बांधव जनावरे नसून माणसेच आहेत याची सुद्धा जाणीव आपण ठेवणे गरजेचे आहे अशा भावना राहणापूरच्या विद्यार्थ्यांकडून उमटत आहेत ,आदिवासी बांधवांच्या मुलांचा जन्म आजही तांड्यात होतो, नोंद राहत नाही, हे वास्तव सर्वांना ठाऊक आहे. मग आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र यंत्रणा निष्क्रिय का?

डॉक्टर मुख्यालयी नसतात, मार्गदर्शन होत नाही, ग्रामपंचायत पाठपुरावा करत नाही, आणि तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना पाच वर्षे ही बाब दिसलीच नाही? कोट्यवधींचा महोत्सव काही दिवसांत उभा राहतो; पण तेरा मुलांची ओळख सिद्ध करण्यासाठी पाच वर्षे अपुरी कशी? हा प्रश्‍न थेट कार्यक्षमतेवर घाव घालणारा आहे. आधार कार्ड हा विलास नाही, तो शिक्षण, शिष्यवृत्ती, आरोग्य आणि शासन योजनांचा प्रवेशद्वार आहे. तेच प्रवेशद्वार बंद ठेवून विकासाचा गजर करणे म्हणजे आदिवासी समाजाची दिशाभूल नाही का? पालकांचा संताप उफाळतोय: “या मातीत जन्मलो, तरी ओळख मागतोय. भ्रष्ट मार्ग नाही, पैसा नाही, म्हणून हक्क नाकारला जातोय का?” हा प्रश्न केवळ भावनिक नाही; तो लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना भिडणारा आहे.

आज राहणापूरच्या तेरा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे; उद्या शेकडोंचा होऊ शकतो. तात्काळ विशेष शिबिर घेऊन जन्मनोंदणी व आधार प्रक्रिया पूर्ण करण्याची स्पष्ट वेळापत्रकासह घोषणा करा,अन्यथा “महोत्सवातील विकास” हा केवळ मंचापुरता आणि कॅमेऱ्यापुरता असल्याचा ठपका अधिक ठळक होईल. मंचावर भाषण, पण जमिनीवर कृती कधी? झगमगाटात महोत्सव, पण मुलांच्या हक्कांवर का अडथळ्यांचा ठोकळा?असा यक्ष प्रश्न देवेंद्र भाऊ व मोदी सरकारच्या कार्यकाळात उपस्थित केल्या जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish