“अकोटची वाट लागली फार- जनता त्रस्त, प्रशासन बेकार तर गोंधळाचा बाजार-!” दादागिरी मोकाट अन् कायदा सुसाट..
abhijit Solanke 11 April 2026
अकोट : शहरातील सार्वजनिक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून सामान्य प्रवाशांचे जीवन अक्षरशः नरकयातना भोगण्यासारखे झाले आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची साधी सोय नाही, बसेसवर फलक नाहीत, आणि एसटी वाहकांवर उघडपणे दमदाटी व मारहाण होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
शहरातील अतिक्रमण, ऑटो व लक्झरी खाजगी वाहनांची दादागिरी एवढ्या टोकाला पोहोचली आहे की, एका एसटी वाहकाला कंटाळून थेट रस्त्यावर बसून आंदोलन करण्याची वेळ आली. ही केवळ एका कर्मचाऱ्याची वेदना नसून संपूर्ण एसटी व्यवस्थेची ओरड आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून एसटी वाहक रडकुंडीला आले आहेत, मात्र नगरपालिका आणि प्रशासनाला याचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे.
अकोटमध्ये अतिक्रमणाला खुलेआम मोकळीक देण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, तब्बल १२ ते १३ लाख रुपयांच्या ठेक्यांद्वारे अतिक्रमणधारकांना जणू अधिकृत परवानगीच देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, खाजगी लक्झरी वाहनांची मनमानी सुरू असून पोलिसांकडे हप्ते पोहोचत असल्याची कुजबुज शहरात जोर धरत आहे. त्यामुळे ट्राफिक पोलिसांचे हात जणू बांधले गेले आहेत.
एसटी स्थानकात प्रवाशांची अवस्था दयनीय झाली असून जागा मिळवण्यासाठी रोज भांडणे, धक्काबुक्की सुरू आहे. अशा बिकट परिस्थितीतही तिकीटवाढीची टांगती तलवार लटकत असल्याने सामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. एकीकडे मूलभूत सुविधा नाहीत, आणि दुसरीकडे आर्थिक लूट – हा दुहेरी अन्याय अकोटकर सहन करत आहेत.

दरम्यान, शहरातील लोकप्रतिनिधी अवैध व्यवसाय आणि ठेकेदारीत व्यस्त असल्याचे आरोप होत असून विद्यमान आमदार व नगरपालिका प्रशासनाने जनतेला अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. निवडणुकीच्या काळातच जनतेची आठवण काढणारे नेते, नंतर मात्र पूर्णपणे गायब होतात, अशी टीका होत आहे.
भोळी जनता आजही एसटी असो किंवा खाजगी वाहन – धक्के खात, त्रास सहन करत प्रवास करत आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याशिवाय पर्याय नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. जातीय राजकारणात अडकलेल्या अकोटकरांना वास्तवाची जाणीव कधी होणार, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, “या सर्व अराजकतेला जबाबदार कोण?” हा प्रश्न सुज्ञ नागरिक प्रशासनाच्या तोंडावर थेट फेकत आहेत. मात्र उत्तर देणारे कुणीच नाही – आणि अकोट शहर मात्र हळूहळू व्यवस्थेच्या ढासळत्या खाईत लोटले जात आहे.







