“अकोट आगाराचा मृत्यूघंटा: भंगार बसमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात, सत्ताधारी मात्र एसीत मजेत!”
abhijit Solanke 17 April 2026
अकोट :अकोट आगाराची अवस्था आता केवळ निष्काळजीपणाची नाही, तर थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारी ठरली आहे. काल अकोटहून नागपूरकडे निघालेली बस ढगा फाटा येथे भर उन्हात बंद पडली आणि प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले गेले. पाण्याचा थेंब नाही, सावली नाही,तहानलेल्या अवस्थेत प्रवासी चक्कर येऊन कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभे होते. ही घटना म्हणजे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस आहे.
अकोट आगारातील बसेस म्हणजे चालती-बोलती भंगार पेटीच! फलक नाहीत, वेळापत्रकाचा मागमूस नाही, सुरक्षिततेचा प्रश्नच नाही. प्रवाशांना सेवा देण्याऐवजी जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा संताप उफाळून आला आहे. विद्यमान आमदारांनी पाच बसेस मिळाल्याचा ढोल पिटला, पण त्या बसेस नेमक्या कुठे गेल्या याचा पत्ता नाही. एवढ्या मोठ्या मतदारसंघासाठी पाच बसेस म्हणजे जनतेची थट्टा की राजकीय स्टंटबाजी?राज्यातील इतर ठिकाणी आधुनिक बसस्थानके उभी राहत असताना अकोट बसस्टँडचे बांधकाम वर्षानुवर्षे रखडले आहे. बसायला जागा नाही, उभे राहण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही,ही अवस्था म्हणजे थेट प्रशासनाचे अपयश आणि जनतेवरील अन्याय आहे.भर उन्हात प्रवासी रस्त्यावर होरपळत असताना लोकप्रतिनिधी मात्र एसी गाड्यांमध्ये सुखाचा प्रवास करत आहेत. त्यामुळे गरीब जनतेचा वापर फक्त मतदानापुरताच होतो, हे पुन्हा एकदा ठळकपणे सिद्ध झाले आहे. अकोट मतदारसंघातील जनता आता अक्षरशः रडकुंडीला आली असून “आमचा वाली कोण?” हा संतप्त सवाल रस्त्यावर घुमू लागला आहे.जर तात्काळ ठोस कारवाई झाली नाही, तर हा संताप ज्वालामुखीसारखा फुटेल आणि प्रशासनाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,हे आता स्पष्ट झाले आहे.







