INDIA NEWS

Press

अकोट आयसीडीएस कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर..

salim khan 21 September 2025

कार्यालय रामभरोसे – कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, भ्रष्टाचाराचे आरोप, वरिष्ठ अधिकारीही हैराण

अकोट आयसीडीएस (एकात्मिक बालविकास योजना) कार्यालय सध्या पूर्णपणे रामभरोसे चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कार्यालयीन कामकाजात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, वेळेवर न येणे, जबाबदारी टाळणे यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सीडीपीओ अमित रायबोले यांच्याकडे अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांचा प्रभार असून ते कायम अकोला मुख्यालयातील बैठकींमध्ये व्यस्त असल्याने नियमितपणे अकोट कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. कनिष्ठ सहाय्यक मधुकर राठोड हे अकोला येथून ये-जा करीत असल्याने वेळेवर पोहोचू शकत नाहीत, तर विस्तार अधिकारी प्रवीण उईके हे अमरावतीहून प्रवास करतात. त्यामुळे कार्यालयीन कारभारात सातत्य व शिस्त दोन्हीचा अभाव आहे.

याशिवाय, पर्यवेक्षिका प्रतीक्षा शेगोंकार यांचा हस्तक्षेप व दबाव ही परिस्थिती अधिक गंभीर बनवत आहे. त्यांच्या कारकीर्दीत यापूर्वी सेविकांच्या साड्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले होते. प्रत्यक्षात २३५ रुपयांची साडी तब्बल ८०० रुपयांना विकण्यात आल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून चौकशी दडपण्यात आल्याचा आरोप आहे.

आरटीआयद्वारे मिळालेल्या माहितीप्रमाणे, प्रतीक्षा शेगोंकार यांचा संपूर्ण कारभार हा अकोट कार्यालयाऐवजी अकोला येथील सितारा टॉवरवरून चालतो. त्यामुळे स्थानिक कार्यालयात कर्तव्याचा लेखाजोखा किंवा कार्यपद्धती याचा ठसा दिसून येत नाही.

स्थानिक असल्यामुळे कनिष्ठ सहाय्यक गजानन चंदन यांनी काही काळ या अव्यवस्थेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता.वेळेवर कार्यालयात उपस्थित राहिल्याने कामकाज काही प्रमाणात नियमित राहिले. पण त्यांच्या हिवरखेड येथे बदलीनंतर पुन्हा कार्यालय शेगोंकार यांच्या मनमानीखाली गेले.

दरम्यान, शेगोंकार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात होत आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्मचारीवर्ग दहशतीत काम करत असून शेगोंकार यांना एका अदृश्य शक्तीचे संरक्षण असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

या सर्व गोंधळ व भोंगळ कारभारामुळे अकोट आयसीडीएस कार्यालयाचा वाली कोण? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish