अकोटचा फटाका बाजार की “परवाना सिंडिकेट”.. अटी शर्तींचा फज्जा तर नागरिकांच्या जीवाशी खेळ!
parmeshwar Patil 18 September 2025

अकोट शहरात फटाक्यांच्या परवान्यांचा व्यवसाय आता थेट “भ्रष्टाचाराचा बाजार” बनला आहे!
प्रशासनाच्या डोळ्यांसमोर चालणारा हा काळा बाजार शहराला स्फोटक संकटाच्या दारात उभा करतो आहे.
एका कुटुंबातील चार-पाच सदस्यांच्या नावावर फटाक्यांचे परवाने, ते लाखो रुपयांना भाड्याने देणे — आणि अधिकारी फक्त पाहत बसले आहेत.
कायदा आहे, पण अंमलबजावणी नाही — कारण या खेळात सत्ताधाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण हातात हात घालून बसले आहेत, असा नागरिकांचा संतप्त आरोप आहे.

धोक्याच्या सावलीत शहर — वरली बहाद्दरांमुळे परिसर बनला “विस्फोटाचा अड्डा”! त्यामुळे परिसरात अवैध व्यवसायांचे जाळे पसरले आहे.
दारू पिऊन बेधुंद अवस्थेत रस्त्यावर बेशुद्ध पडलेले लोक, गांजाचे सेवन करणारे तरुण, बिडी-सिगरेटच्या धुरात हरवलेले मद्यपी — या गोंधळातच फटाक्यांची दुकाने उभारण्यात आली आहेत!
ज्वलनशील वस्तूंनी भरलेली दुकाने आणि त्याच परिसरात दारू, सिगरेट, गांजा — हा म्हणजे आग लावण्यासाठी तयार ठेवलेला बारूदाचा ढीगच!
कोणत्याही क्षणी एखादी ठिणगी पडली तरी संपूर्ण भाग भस्मसात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण प्रशासन मात्र झोपलेले आहे — जणू एखाद्या दुर्घटनेची वाटच पाहत आहे!
उपविभागीय अधिकारी आणि संबंधित विभागांचा संशयास्पद मौन!

परवाने तपासले जात नाहीत, दुकाने तपासली जात नाहीत, आणि अटी-शर्तींचा फज्जा उडतो आहे.
नियमांचे पालन करणाऱ्यांवर मात्र दबाव आणि त्रास — तर नियम तोडणाऱ्यांना संरक्षण.
हे मौन, हा अक्षम्य निष्काळजीपणा आणि हा भ्रष्टाचाराचा वास, थेट प्रशासनाकडे निर्देश करतो.
हा फटाका बाजार नाही — ही भ्रष्ट अधिकाऱ्यांची उघडी लूट आहे!
नागरिकांचा संताप उफाळला — “दुर्घटना घडल्यावर जबाबदार कोण?”

“शहरात एखादी भीषण दुर्घटना घडली, तर जबाबदारी कोणाची? परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांची, की फक्त नशेत बुडालेल्या परिस्थितीची?”
शहरात आज संतापाचा ज्वालामुखी पेटला आहे.
“फटाक्यांच्या नावाखाली सुरू असलेली ही लूट बंद करा, नाहीतर पुढच्या स्फोटाचा आवाज प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचेल!”
असा नागरिकांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारला आहे







