गर्ल्स उर्दू हायस्कूल चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांची चौकशी होणार- शिक्षणाधिकाऱ्यांकडून चौकशीचे निर्देश..
salim khan 27 September 2025
अखेर रविराज मोरे यांच्या लढ्याला यश..

अकोट : शहरातील नामांकित गर्ल्स उर्दू हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या गैरप्रकारांचे पडसाद अखेर शासनापर्यंत पोहोचले आहेत. पाच ते सात वर्षांपासून शाळेत न जाता फक्त पगार लाटणारा आणि शासनाची लाखो रुपयांनी फसवणूक करणारा शिक्षक नाझीर उल्ला पटेल यांच्या चौकशीचे आदेश अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पत्रकार रविराज मोरे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या प्रखर पाठपुराव्याला यश मिळाले असून आता या गैरप्रकारांची थेट चौकशी सुरू होणार आहे.
नाझीर उल्ला पटेल शाळेत शिकवण्यासाठी गेलाच नाही. पगार मिळवण्यासाठी हजेरी बुक घरी नेऊन सह्या करून शासनाला आजपर्यंत कोटी रुपयांचा चुना लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर २०१९ मध्ये ४२० च्या गुन्ह्यात जेल कस्टडीत असतानाही त्यांचा पगार सुरळीतपणे सुरू होता. नियमाप्रमाणे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र उलट व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापिकाच या सर्व कारस्थानात सामील असल्याचे चित्र समोर येत आहे.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थेट खेळ करणाऱ्या या शाळेत पालक आणि विद्यार्थ्यांना आवाज उठवल्यास धमकावले जाते, अशा गंभीर तक्रारी आहेत. याकडे वारंवार शासन व शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. अखेर पत्रकार रविराज मोरे यांनी हा विषय आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण करून लढा उभारला. त्यांच्या या कठोर लढ्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना हालचाल करावी लागली असून आता संपूर्ण चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
“नाझीर उल्ला पटेल यांची जेल कस्टडीत असतानाची नोंद तपासली जाईल. कर्तव्यात कसूर व शासनाची दिशाभूल केली असल्यास तातडीने निलंबनाची कारवाई केली जाईल त्यानुसार सविस्तर अहवाल मुख्याध्यापकाला सादर करावा लागेल.” असे आदेशात नमूद आहे

यामुळे आता गर्ल्स उर्दू हायस्कूलमधील सर्व लपवलेले गैरप्रकार उघड होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. मुख्याध्यापिकेसह व्यवस्थापन समितीवरही कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. अखेर मुख्याध्यापिका नाझीर उल्ला पटेल यांना वाचवण्यासाठी आणखी काही डावपेच रचतात की चौकशी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.







